Amravati Girls Assault Case : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात उघडकीस आलेलं लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलचं प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात संतापाची लाट निर्माण करत आहे. वरकरणी साधं वाटणारं हे प्रकरण प्रत्यक्षात मात्र अत्यंत नियोजित, धोकादायक आणि मन हेलावून टाकणारं असल्याचं तपासात समोर येत आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अयान अहमद… एक असा तरुण, ज्याने केवळ गुन्हेगारी कृत्य केलं नाही, तर त्याला एक प्रकारचा गेम बनवलं. मित्रांमध्ये फुशारक्या मारण्यासाठी, स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि चुकीच्या अहंकारातून त्याने अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्याचा जणू सपाटाच लावला होता. ही केवळ एक-दोन घटनांची मालिका नसून, गेल्या काही काळापासून सुरू असलेला एक ठरवून केलेला पॅटर्न होता.
अयानची पद्धत अत्यंत चलाख आणि विचारपूर्वक आखलेली होती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे एक तथाकथित लव्ह गुरु होता, जो त्याला मुलींशी कसं बोलायचं, त्यांचा विश्वास कसा जिंकायचा आणि त्यांना भावनिकरीत्या कसं गुंतवायचं याबाबत मार्गदर्शन करत होता. साधे हाय-हॅलो मेसेज न पाठवता थेट असे प्रश्न विचारायचे ज्यामुळे समोरच्या मुलीला उत्तर द्यावाच लागेल, ही त्याला दिलेली एक महत्वाची टीप होती. आप वही हो ना, जो वहा मिले थे? अशा प्रकारच्या संदेशांमधून तो संवादही सुरूवात करत असे.
एकदा संवाद सुरू झाला की, तो हळूहळू त्या मुलीचा विश्वास संपादन करत असे. ओळख वाढवून, जवळीक निर्माण करून तो त्यांना भेटण्यासाठी तयार करत असे. आणि इथून पुढे सुरू होतं या सगळ्या प्रकरणाचं काळ वास्तव. अमरावती शहरातील एका मित्राच्या फ्लॅटचा वापर या गैरकृत्यांसाठी करण्यात येत होता. वर्षभरात सात ते आठ वेळा तरी मुलींना त्या ठिकाणी नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या फ्लॅटचा संबंध मानव सुगंधे या व्यक्तीशी असून, त्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. अयान आणि मानव यांची थेट ओळख नव्हती, मात्र कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून ते संपर्कात आले. प्रत्येक वेळी ठराविक रक्कम देऊन अयान त्या फ्लॅटमधील खोलीचा वापर करत होता.
सगळीकडे नुसती चर्चा! पठ्ठ्या क्यूट पोरीसोबत ‘डेट’वर गेला अन् खिशाला ‘थेट’ होल झाला
फक्त फ्लॅटपुरतंच हे प्रकरण मर्यादित नव्हतं. अमरावती आणि परतवाडा येथील काही कॅफेमध्ये देखील आक्षेपार्ह वर्तन झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी या सर्व ठिकाणांचा शोध सुरू केला असून, घटनांची साखळी अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि गंभीर भाग म्हणजे, व्हिडिओ व्हायरल होण्याची साखळी. अयानने केलेल्या कृत्यांचे व्हिडिओ त्याने स्वतःजवळ ठेवण्याऐवजी मित्रांमध्ये शेअर केले. आणि इथूनच सुरू झाली एक भयावह चेन. एकाकडून दुसऱ्याकडे, दुसर्याकडून तिसर्याकडे असे करत हे व्हिडिओ वेगाने पसरत गेले. या साखळीत अनेक जण सहभागी असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी आतापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक केली असून, तपास अजूनही सुरू आहे.
ही साखळी अजून पूर्णपणे संपली नाही, त्यामुळे पुढे आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे डिजिटल युगात विश्वास ठेवताना आणि नवीन ओळखी करताना सावधगिरी बाळगणं किती महत्वाचं आहे. सोशल मीडियावर चॅटिंगद्वारे निर्माण होणाऱ्या नात्यांमध्ये अंधविश्वास ठेवल्यास त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याचं हे जिवंत उदाहरण आहे.
हा प्रकार केवळ कायद्याचा भंग नाही, तर मानवी संवेदनांचा विश्वासाचा आणि सुरक्षिततेचा घोर अपमान आहे. अशा घटनांविरोधात केवळ पोलीस कारवाई पुरेशी नाही, तर समाज म्हणूनही आपण जागरूक होणं आवश्यक आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील कोणाला अशा प्रकारचा अनुभव आला असेल तर गप्प बसू नका. त्वरित पुढे या, मदत घ्या आणि संबंधित यंत्रणांना माहिती द्या. कारण आवाज उठवणं हीच न्याय मिळवण्याची पहिली पायरी असते. आणि लक्षात ठेवा, ऑनलाईन जग जितकं सोपं वाटतं, तितकंच ते धोकादायक देवल असू शकतं.
