अमरावतीच्या एपीआयची हत्या; फोर व्हिलरने उडवलं नंतर धारदार शस्त्राने सपासप वार, तीन आरोपींना अटक

Amravati Crime : अमरावती शहरातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अब्दुल कलाम हत्या (Amravati Crime) प्रकरणातील आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन अटक केली असून फआजील खान साबीर खान, जियान उद्दीन ऐसान उद्दीन, आवेज खान आयुब खान अशी आरोपींची नावे आहेत.
नेमकं काय घडलं?
अमरावती सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादर असं हत्या झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचं नाव असून कलाम यांच्या दुचाकीला आधी आरोपींनी फोर व्हिलरने धडक दिली. त्यानंतर कलाम यांच्या पोटावर, छातीवर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. या घटनेनंतर हल्लेखोर फाजील खान घटनास्थळावरुन पसार झाला होता.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिस खात्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपीचा ख्वाजानगरमधून जखमी अवस्थेत ताब्यात घेण्यात आलं. त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या हत्येमागील कारण अद्याप समोर आलेलं नसून एका पोलिस अधिकाऱ्याचीच अशा पद्धतीने हत्या करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य माणसांची कशी सुरक्षा करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कलाम यांच्यावर वार केल्यानंतर त्यांना जवळच्या बेस्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांचे दोन पथके तयार करण्यात आली.