Amravati Samrudhhi Highway Accident leaves 7 dead and 18 injured : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर दुर्गादेवीची मूर्ती घेऊन परतणाऱ्या तरुणांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेगाव येथून देवीची मूर्ती घेऊन येत असताना हा अपघात घडला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून अनेक जण जखमी झाले आहेत.
धामणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर मध्यरात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. सिंदी मेघे येथील दुर्गामाता मंडळाचे सदस्य शेगावहून उंच दुर्गामूर्ती घेऊन टाटा एस वाहनातून परतत होते. त्यावेळी रस्त्यावर मूर्तीसह जात असताना दुसऱ्या वाहनाची त्यांना जोरदार धडक बसल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघाताची तीव्रता एवढी होती की, वाहनातील काही तरुण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जखमींना तातडीने उपचारासाठी वर्धा येथील सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, काही जखमींची प्रकृती गंभीर आहे, तर काहींना किरकोळ दुखापत झाली आहे.
सिंदी मेघे परिसरातील दुर्गामाता मंडळाचे सदस्य दरवर्षी नवरात्रोत्सवासाठी शेगाव येथून देवीची मूर्ती आणतात. यंदाही मंडळातील तरुण मूर्ती घेण्यासाठी शेगावला गेले होते. मात्र, परतीच्या प्रवासात समृद्धी महामार्गावर काळाने घाला घातला.
या दुर्घटनेची माहिती परिसरात पोहोचताच सिंदी मेघे गावावर शोककळा पसरली. नवरात्रोत्सवाच्या तोंडावर मंडळातील तरुण सदस्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
