Amravati Sex Scandal Update : हातात पिस्तुल, दिमतीला आलिशान ‘थार’ जीप आणि सोशल मीडियावर मिरवलेली नोटांची बंडलं… एखाद्या चित्रपटातील गुंडाला शोभेल असा रुबाब दाखवून 19 वर्षांच्या अयान अहमदने अमरावतीत तरुणींच्या शोषणाचे भयाण जाळे विणले होते. प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, फिरायला नेण्याच्या बहाण्याने लैंगिक शोषण करायचे आणि त्यानंतर अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करायचे, अशा या धक्कादायक ‘सेक्स स्कँडल’ने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी अयान अहमदसह त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
थार आणि पैशांच्या जोरावर घालायचा भुलथाप
अयान अहमदची ‘मोडस ऑपरेंडी’ अत्यंत कुटील होती. तो आपल्या वडिलांच्या जुन्या कार विक्रीच्या व्यवसायातील महागड्या गाड्या (विशेषतः MH 27 DL 3100 क्रमांकाची थार) वापरून मुलींवर प्रभाव पाडायचा. सोशल मीडियावर रिल्स बनवून, हातात पिस्तुल घेऊन आणि पैशांची बंडलं दाखवून तो तरुणींना आकर्षित करत असे. एकदा मुलगी जाळ्यात अडकली की, तिला महागड्या हॉटेल्स किंवा अमरावती, परतवाडा येथील कॅफेंमध्ये नेऊन तो तिचे शोषण करायचा.
मित्राचा फ्लॅट आणि ब्लॅकमेलिंगचे सत्र
तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, अयानचा मित्र मानव सुगंधे हा पैशांच्या मोबदल्यात आपला फ्लॅट अयानला उपलब्ध करून देत होता. याच फ्लॅटवर अयानने तरुणींवर अत्याचार केले आणि त्याचे व्हिडिओ बनवले. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो पीडितांकडून पैसे उकळत असे. आतापर्यंत असे 100 हून अधिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
कोणाकोणाला झाली अटक?
ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत चार मुख्य सूत्रधारांना अटक केली आहे. यात मुख्य आरोपी अयान अहमद तनवीर अहमद (19) , उजेरखान इकबाल खान (20) व्हिडिओ डाऊनलोड करून व्हायरल केल्याचा आरोप, मोहम्मद साद मोहम्मद साबीर (22) व्हॉट्सॲपवरून व्हिडिओ पसरवणारा आणि तरबेज खान तसलिम खान (24) व्हिडिओ प्रसारात सक्रिय सहभाग असलेला आरोपी या चौघांना अटक केली आहे.
राजकीय वरदहस्ताची शक्यता?
19 वर्षांच्या मुलाकडे इतका पैसा, महागड्या गाड्या आणि पिस्तुल कुठून येत होतं? या प्रश्नामुळे पोलिसांना राजकीय कनेक्शनाचा संशय आहे. अयान एखाद्या राजकीय नेत्यासाठी काम करत होता का? किंवा त्याला कोणाचे पाठबळ होते का? याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल घेत अयानच्या घरावर प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात आला आहे.
SIT कडून कसून तपास
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून डॉ. शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. यात 10 पोलीस अधिकारी आणि 36 कर्मचाऱ्यांचा ताफा असून, हे रॅकेट किती खोलवर पसरले आहे आणि यात अजून कोणाचे हात गुंतले आहेत, याचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे.
