रायगडची जागा अखेर राष्ट्रवादीच्या वाट्याला; उमेदवारी निश्चित होताच अनिकेत तटकरेंनी घेतले एकनाथ शिंदेंचे आशीर्वाद

अनिकेत तटकरे यांनी वडील सुनील तटकरे यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.

Untitled Design 18 2

Untitled Design 18 2

Aniket Tatkare took Eknath Shinde’s blessings  : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असताना महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात रायगडच्या जागेवरून सुरू असलेली रस्सीखेच अखेर राष्ट्रवादीच्या बाजूने निकाली निघाली असून, खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मनाली जात आहे.

उमेदवारी निश्चित झाल्यानंतर अनिकेत तटकरे यांनी वडील सुनील तटकरे यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर अनिकेत तटकरे यांनी सोशल मीडियावर माहिती देत, आगामी राजकीय वाटचालीसाठी शिंदे यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभल्याचे सांगितले.

अनिकेत तटकरे यांनी म्हटले की, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे मार्गदर्शन लाभले तसेच जनसेवा, संघटन बळकटीकरण आणि विकासाच्या ध्येयाने कार्य करण्यासाठी प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधी मिळाली. आगामी काळातील राजकीय वाटचालीसाठी त्यांचे आशीर्वाद देखील प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले.

विषारी दारू प्रकरणातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

दरम्यान रायगडच्या जागेसाठी शिवसेनेकडून मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी हे आग्रही होते. त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळावी, अशी पक्षातील अनेकांची अपेक्षा होती. मात्र महायुतीच्या अंतिम सूत्रानुसार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. विशेष म्हणजे, महेंद्र दळवी यांच्या कन्येने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रायगडच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत अनिकेत तटकरे यांनी एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली जात आहे.

राजकीय वर्तुळात या भेटीची वेगवेगळी चर्चा रंगली असून, रायगडच्या जागेवर राष्ट्रवादीच्या उमेदवारामागे शिवसेना नेतृत्व देखील ठामपणे उभे असल्याचा संदेश देण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आल्याची चर्चा आहे. विशेषतः शिंदे यांनी अनिकेत तटकरे यांच्या खांद्यावर हात ठेऊन काढलेला फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यातून शिवसैनिकांपर्यंत स्पष्ट राजकीय संदेश पोहोचल्याचे बोलले जात आहे.

रायगडमधील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट केवळ सदिच्छा भेट नसून, महायुतीतील समन्वय आणि एकजूट दाखवणारा राजकीय संकेत असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे आता रायगडच्या निवडणुकीत महायुतीची एकजूट कितपत प्रभावी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version