‘रोहित पवार मानसिक रोगी झाले आहेत’; संजय काकडेंची टीका, म्हणाले, ‘पवार आडनाव काढून टाका, मग बघा…’
Sanjay Kakade: लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत संजय काकडे यांनी राष्ट्रवादीतील घडामोडी, विलीनीकरण, डिलिमिटेशन, रोहित पवारांवर भाष्य केले.
Sanjay Kakade slams Rohit Pawar over NCP politics and delimitation: पुणे : राज्यसभेचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केलेले संजय काकडे (Former MP Sanjay Kakade) यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘रोहित पवार मानसिक रोगी झाले आहेत’, असे विधान करत त्यांनी रोहित पवारांच्या आक्रमक राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच, रोहित पवारांनी त्यांचं ‘पवार’ हे आडनाव काढून टाकावं, त्यानंतर त्यांची काय अवस्था होते ते पाहा, असेही काकडे म्हणाले. लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी, दोन्ही राष्ट्रवादींचे संभाव्य विलीनीकरण, डिलिमिटेशन आणि रोहित पवार यांच्यासह विविध विषयांवर भाष्य केले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, पण पाच महिने राजकारणापासून अलिप्त
संजय काकडे यांनी आपण चार महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केल्याचे सांगितले. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्यानंतर आणखी पाच महिने राजकारणापासून अलिप्त राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या काळात व्यवसायाकडे लक्ष देणार असल्याचे काकडे म्हणाले.
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर स्टॅलिन यांचा ठाम निर्णय, राहुल गांधींच्या मनधरणीला अपयश
मार्च 2020 मध्ये राज्यसभेची टर्म संपल्यानंतरही पुण्यातील नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक आपल्याला विसरलेले नाहीत, असा दावा त्यांनी केला. आजही आपण अनेकांची कामे करून देतो. मात्र, पक्षाच्या बैठका आणि राजकीय कार्यक्रमांना जाणे टाळतो. सत्ता किंवा पद नसले तरी लोकांची कामे करता येतात, असेही त्यांनी सांगितले.
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणे कठीण
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटांचे विलीनीकरण होणे कठीण असल्याचे मत संजय काकडे यांनी व्यक्त केले. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, तसेच अनेक नेत्यांच्या पदांबाबत मतभेद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे विलीनीकरणाचा मार्ग सोपा नाही, असे ते म्हणाले.
दुसरीकडे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यताही त्यांनी नाकारली नाही. सुप्रिया सुळे यांनी केलेली विधाने आणि डिलिमिटेशन विधेयकाला त्यांनी दिलेला पाठिंबा पाहता, अशी शक्यता नाकारता येत नसल्याचे काकडे म्हणाले.
डिलिमिटेशननंतर पुण्यात सहा मतदारसंघ होणार?
मतदारसंघ पुनर्रचना झाल्यास निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला वेगळा मतदारसंघ शोधण्याची गरज नाही, असे संजय काकडे म्हणाले. पुणे जिल्ह्यात कुठूनही निवडणूक लढवली तरी आपण पराभूत होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या पुण्यात तीन मतदारसंघ आहेत. पुनर्रचनेनंतर त्यांची संख्या सहा होऊ शकते. पक्ष जो आदेश देईल, त्या मतदारसंघातून निवडणूक लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डिलिमिटेशनच्या माध्यमातून भाजप स्वतःच्या सोयीचे मतदारसंघ तयार करत असल्याच्या आरोपांवर बोलताना काकडे म्हणाले की, मतदारसंघाचे प्रभाग कसे पडतात यापेक्षा त्या मतदारसंघात कोण काम करते, हे महत्त्वाचे आहे. जनता काम करणाऱ्या उमेदवारालाच निवडून देईल. पुण्यातील मेट्रो आणि कनेक्टिंग लिंकसारख्या विकासकामांचा उल्लेख करत भाजपला आपण चांगले काम करत असल्याची खात्री आहे, असे ते म्हणाले.
मतदारसंघ पुनर्रचनेत मुस्लिमबहुल मतदारसंघ वेगळे काढले जातील का, या प्रश्नावर त्यांनी असे होणार नसल्याचे मत व्यक्त केले. कोणता समाज कोणत्या पक्षाशी बांधील आहे, हा समज आता बदलला पाहिजे. मतदार उमेदवार पाहून मतदान करतो आणि भविष्यात राजकारण जाती-धर्माच्या पलीकडे जाईल, असे काकडे म्हणाले.
‘रोहित पवार डिप्रेशनमध्ये आले’
रोहित पवार यांच्या आक्रमक राजकीय भूमिकेवर टीका करताना संजय काकडे यांनी त्यांच्याबाबत एक विधान केले. रोहित पवार राजकारणात आले, तेव्हा अजित पवार आणि सुप्रिया सुळे हेच प्रमुख चेहरे होते. मात्र, आता पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवार राजकारणात सक्रिय झाले असून संपूर्ण पक्ष सांभाळू लागले आहेत. त्यामुळे रोहित पवार डिप्रेशनमध्ये आलेत, ते मानसिक रोगी झालेत, असा दावा काकडे यांनी केला.
शरद पवार एनडीएमध्ये आल्यास महाराष्ट्राचा राजकीय ‘भूगोल’ कसा असेल ?
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही त्यांनी भाष्य केले. या अपघाताबाबतचे उत्तर शरद पवार यांनी त्याच दिवशी दिले होते की, ‘अजित पवारांचा अपघात झाला आहे, यामागे कोणतेही कटकारस्थान नाही’, असे काकडे म्हणाले. रोहित पवार प्रत्येकाला क्रॉस जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
‘आम्ही शरद पवार साहेब आहेत तोपर्यंत गप्प आहोत’
रोहित पवारांनी केवळ आंदोलने केली, मात्र संबंधित प्रश्नांवर मंत्रालयात जाऊन चर्चा केली नाही, असा आरोपही काकडे यांनी केला. पुण्यातील न्यायालय परिसरातील हल्ल्यांच्या घटनांवरून रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. फडणवीसांना ‘मफलरमॅन’ म्हणत केलेले आरोप हे झोपडपट्टीतील गुन्हेगारांसारखे असल्याची टीका काकडे यांनी केली.
‘आम्ही शरद पवार साहेब आहेत तोपर्यंत गप्प आहोत’, ‘रोहित पवारांनी त्यांचं पवार हे आडनाव काढून टाकावं, मग त्यांची काय अवस्था होते ते पाहा.’ असे विधानही संजय काकडे यांनी यावेळी केले.