परिसीमनविरोधात INDIA आघाडीचा मास्टरप्लॅन! सोनिया गांधी, खर्गे चेन्नईत दाखल; स्टॅलिन निर्णय फिरवणार?
परिसीमन विधेयक रोखण्यासाठी इंडिया आघाडीच्या बड्या नेत्यांनी हालचाली वाढवल्या असून, चेन्नई ते मुंबईपर्यंत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
INDIA Bloc Against Delimitation Bill : परिसीमन विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापले असून, या विधेयकाला विरोध करण्यासाठी इंडिया आघाडीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. विरोधकांमध्ये एकमत घडवून आणण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील प्रमुख नेते तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेण्यासाठी चेन्नईत दाखल झाले आहेत.
या भेटीमागे परिसीमन विधेयकाविरोधात विरोधकांची एकत्रित रणनीती आखण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. स्टॅलिन यांच्याशी चर्चा करून विधेयकाला विरोध करण्यासाठी त्यांची भूमिका अधिक ठाम करण्याचा काँग्रेस नेतृत्वाचा प्रयत्न आहे. त्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुंबईकडे रवाना होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरेही उपस्थित राहण्याची शक्यता असून, विरोधकांच्या पुढील राजकीय रणनीतीवर चर्चा होणार आहे.
या दौऱ्यात इंडिया आघाडीतील अनेक प्रमुख नेत्यांचा सहभाग आहे. मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, कपिल सिब्बल यांच्यासह विविध विरोधी पक्षांचे नेते चेन्नईत पोहोचले आहेत. दुसरीकडे, राहुल गांधी यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. मात्र, राजदच्या खासदार मीसा भारती या चेन्नई आणि मुंबईच्या दौऱ्यात सहभागी झालेल्या नाहीत. त्यांच्या पक्षाकडून अभय कुशवाह आणि सुधाकर सिंह यांनी उपस्थिती लावली आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. लोकसभेतील जागांची संख्या 850 पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावामुळे देशातील लोकशाही धोक्यात येऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांच्या राजकीय फायद्यासाठी देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याची मोकळीक मिळेल, अशी भीतीही राहुल गांधी यांनी व्यक्त केली. देशाचे हित, तामिळनाडूचे हित आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी हे विधेयक एकजुटीने पराभूत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्टॅलिन यांनी सुरुवातीला इंडिया आघाडीच्या संपूर्ण शिष्टमंडळाला भेटण्याबाबत निर्णय घेतला नव्हता. मात्र, काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी डीएमके खासदार कनिमोळी यांच्याशी चर्चा करून त्यांना निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली. त्यानंतर स्टॅलिन यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्यास सहमती दर्शवली. दुसरीकडे, शरद पवार मागील तीन दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि खर्गे रात्री सुमारे 8:30 वाजता रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. ही बैठक जवळपास एक तास चालण्याची शक्यता आहे.
दरम्यान, परिसीमनच्या मुद्द्यावरून आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यापूर्वीच्या परिसीमन प्रक्रियेत काँग्रेसला फायदा झाला, तेव्हा पक्षाने कोणताही आक्षेप घेतला नव्हता, असा आरोप त्यांनी केला. नव्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवून काँग्रेसला विजय मिळाला होता, मग आता त्याच प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्न का उपस्थित केले जात आहेत, असा सवाल लोकेश यांनी केला. त्यामुळे परिसीमन विधेयकावरून इंडिया आघाडी एकजूट करण्याचा प्रयत्न करत असतानाच सत्ताधारी पक्षांकडूनही विरोधकांवर राजकीय पलटवार सुरू झाले आहेत.