“आमचा डिलिमिटेशनला विरोध का?” उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण; म्हणाले, ‘मंजूर झालं तर देशाला मोठा त्रास होणार’
Uddhav Thackeray Delimitation Bill: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत डिलिमिटेशनच्या विरोधामागची भूमिका स्पष्ट केली.
Uddhav Thackeray Delimitation Bill: डिलिमिटेशन (Delimitation) विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापलं असून, शिवसेना ठाकरे गटाने या विधेयकाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या विरोधामागची भूमिका स्पष्ट केली. पक्षहितापेक्षा महाराष्ट्र आणि देशहित महत्त्वाचं असल्याचं सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या डिलिमिटेशन प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसेच महाराष्ट्रातील सर्व खासदारांना या विधेयकाला विरोध करण्याचं आवाहन केलं आहे.
शरद पवार एनडीएमध्ये आल्यास महाराष्ट्राचा राजकीय ‘भूगोल’ कसा असेल ?
उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्या लोकसभेत डिलिमिटेशन विधेयक मांडलं जाणार आहे. दुर्दैवाने हे विधेयक मंजूर झालं, तर संपूर्ण देशाला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागेल. मलाही या विधेयकाला पाठिंबा देता आला असता. मात्र, मला पक्षहितापेक्षा महाराष्ट्रहित आणि देशहित महत्त्वाचं वाटतं.
डिलिमिटेशन समितीच्या नियुक्तीवर उद्धव ठाकरेंचे प्रश्न
शिवसेना ठाकरे गटाने या विधेयकाला विरोध करण्यामागचं पहिलं कारण सांगताना उद्धव ठाकरेंनी डिलिमिटेशनची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या समितीच्या रचनेवर प्रश्न उपस्थित केले. या समितीतील सदस्यांवर मतचोरीचे आरोप झाले आहेत. ज्ञानेश कुमार यांच्याकडेच डिलिमिटेशनची जबाबदारी देण्यात आली आहे. समितीत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि ज्ञानेश कुमार यांनी नियुक्त केलेली आणखी एक व्यक्ती असेल, असं त्यांनी सांगितलं.
या तिन्ही सदस्यांच्या निवडीवरही त्यांनी आक्षेप घेतला. मोदी आणि अमित शाह यांनीच या नियुक्त्या केल्याची माहिती आपल्यापर्यंत आली असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. तीन सदस्यांच्या समितीत दोन विरुद्ध एक असा निर्णय होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षांचं मत विचारात न घेता ही समिती तयार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
ही समिती म्हणजे केवळ फार्स असून, काय करायचं याची स्क्रिप्ट आधीच तयार आहे. त्यावर सह्या करून ती जनतेसमोर आणण्याचं काम फक्त बाकी आहे, अशी टीका त्यांनी केली. या समितीत सरन्यायाधीश, एक मंत्री आणि विरोधी पक्षनेता असायला हवा होता, असं मतही त्यांनी मांडलं.
‘भाजपने मतदार याद्यांचा अभ्यास केला आहे’
डिलिमिटेशनच्या प्रक्रियेवर आक्षेप घेताना उद्धव ठाकरेंनी 2017 मधील मुंबई महापालिका निवडणुकीचाही संदर्भ दिला. भाजपने गेल्या काही वर्षांत महापालिका, विधानसभा, लोकसभा, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधान परिषद आणि राज्यसभेच्या मतदार याद्यांचा अभ्यास केला आहे. कोणत्या मतदार यादीत कोणत्या पक्षाला सातत्याने मतदान होतं, याची माहिती भाजपकडे असल्याचा आरोप त्यांनी केला.
याच माहितीच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना केली जाऊ शकते. काही मतदारसंघ असे तयार केले जातील की, कितीही प्रचार केला तरी तिथे भाजपलाच मतं मिळतील, असा दावाही उद्धव ठाकरेंनी केला. त्यामुळे डिलिमिटेशन म्हणजे उघडपणे मतचोरी करण्याचा विषय संसदेत आणला जात असल्याची टीका त्यांनी केली.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील जागांच्या फरकावरून सवाल
डिलिमिटेशननंतर लोकसभेच्या जागा वाढणार असल्या, तरी राज्यसभेच्या जागा वाढणार आहेत का, याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राच्या लोकसभेतील जागा 48 वरून 72 होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, उत्तर प्रदेशच्या जागाही 50 टक्क्यांनी वाढणार आहेत. सध्या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील जागांचा फरक 32 आहे. तो वाढून 48 होणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
पाच लाख घेऊन लग्नाचा बनाव, माप ओलांडताच नवरी पसार! तरुण शेतकऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा
तसेच तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशमधील जागांचाही फरक वाढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र देशातील सर्वाधिक कर देणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. मात्र, महाराष्ट्राच्या योगदानाचा परतावा राज्याच्या हितासाठी मिळत नाही. उलट महाराष्ट्राचा गळा दाबला जात आहे, मग हे कसले देशहित? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा, पण डिलिमिटेशन वेगळं आणा
महिला आरक्षण विधेयक आणि डिलिमिटेशन विधेयक एकत्र आणण्यावरही उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतला. महिला आरक्षण विधेयक वेगळं आणा, त्याला मी पाठिंबा देतो. मात्र, त्यात डिलिमिटेशनचा विषय आणू नका, असं त्यांनी स्पष्ट केलं.
‘खोक्यांकडे पाहू नका, उद्या कचऱ्याची पेटी येईल’
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना या विधेयकाला विरोध करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व खासदारांना सांगू इच्छितो की, आता खोक्यांकडे पाहू नका, उद्या तुमच्याकडे कचऱ्याची पेटी येईल. कचऱ्याच्या पेटीत जायचं नसेल, तर या विधेयकाला विरोध करा.
मला आता निर्णय आणि टाइमलाईन पाहिजे! बाबासाहेबांच्या स्मारकावरून फडणवीस आक्रमक
शिवसेना ठाकरे गटाच्या 9 खासदारांना यासंदर्भात पक्षादेश (व्हिप) देण्यात आला असून, त्यानुसार सर्व खासदार मतदान करतील, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. त्यामुळे डिलिमिटेशन विधेयकावरून ठाकरे गटाने केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.