मला आता निर्णय आणि टाइमलाईन पाहिजे! बाबासाहेबांच्या स्मारकावरून फडणवीस आक्रमक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामाला झालेल्या विलंबावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले आहेत.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 29T152536.601

Fadnavis takes an aggressive stance over Babasaheb’s memorial : मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामाला झालेल्या विलंबावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले आहेत. स्मारकाचे काम यावर्षी पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्याप अनेक कामे रखडली आहेत. विशेषतः गेल्या सहा महिन्यांपासून बाबासाहेबांच्या पुतळ्याचे काम बंद असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे स्मारक पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांची आणि शहापूरजी पालनजी कंपनीच्या प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीतील मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये कामाला होणाऱ्या विलंबावरून फडणवीस संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावताना दिसत आहेत.

स्मारकाच्या कामाला उशीर झाला, तर तुम्हाला फरक पडत नाही; पण आम्हाला फरक पडतो. आज तुम्ही बैठकीला आला, पुढच्या बैठकीला दुसऱ्याला पाठवाल आणि त्यानंतर तिसऱ्याला पाठवाल, असं चालणार नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रात यापेक्षाही अधिक गुंतागुंतीचे दहा प्रकल्प आम्ही पूर्ण केले आहेत. मग या प्रकल्पात नेमकी अडचण काय आहे? प्रत्येक वेळी काम कठीण असल्याचे सांगून चालणार नाही. मला आता ठोस निर्णय आणि काम पूर्ण करण्याची निश्चित वेळापत्रक हवे आहे, असे म्हणत त्यांनी संबंधितांना स्पष्ट शब्दांत तंबी दिली.

परिसीमनविरोधात INDIA आघाडीचा मास्टरप्लॅन! सोनिया गांधी, खर्गे चेन्नईत दाखल; स्टॅलिन निर्णय फिरवणार?

दरम्यान, इंदू मिल स्मारकाच्या कामाला विलंब होण्यामागे आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचाही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. आखाती देशांमधील युद्धामुळे तांबे आणि एलपीजी गॅसच्या किमतीत वाढ झाली. परिणामी कांस्याच्या किमतीत वाढ झाल्याने प्रकल्पाचा खर्चही वाढला आहे. यासाठी राज्य सरकारकडे सुमारे ३५० कोटी रुपयांचा वाढीव खर्चाचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यास विलंब झाल्याने पुतळ्याचे काम रखडल्याचे सांगितले जात आहे.

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हा आंबेडकरी समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक विषय आहे. त्यामुळे या प्रकल्पाला होणारा विलंब सातत्याने चर्चेत येत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. इंदू मिल स्मारकाचा प्रवासही तितकाच महत्त्वाचा आहे. 2007 ते 2011 या काळात इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मिळावी, यासाठी आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलने केली.

होकायंत्र दिशा दाखवते, पण हे धोकायंत्र, शरद पवारांवर राज ठाकरेंची खोचक टीका

डिसेंबर 2012 मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी इंदू मिलची 12 एकर जागा स्मारकासाठी देण्यास सैद्धांतिक मान्यता दिली. त्यानंतर एप्रिल 2015 मध्ये केंद्र सरकार, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात जागा हस्तांतरणाचा त्रिपक्षीय करार झाला. 11 ऑक्टोबर 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले.

2017-2018 मध्ये स्मारकाच्या सुधारित आराखड्याला मान्यता मिळाली. सुरुवातीला 250 फूट उंच पुतळ्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यात बदल करून 350 फूट उंच पुतळा आणि 100 फूट पादपीठ अशी एकूण 450 फूट उंचीची रचना प्रस्तावित करण्यात आली. त्यानंतर शहापूरजी पालनजी ग्रुपला बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. आता स्मारकाच्या कामाला होणारा विलंब पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच जाब विचारला आहे. केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष कामाची प्रगती आणि निश्चित कालमर्यादा हवी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर इंदू मिल स्मारकाच्या कामाला किती वेग येतो, रखडलेल्या पुतळ्याचे काम कधी सुरू होते आणि बाबासाहेबांचे भव्य स्मारक प्रत्यक्षात कधी पूर्ण होते, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

follow us