शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाजपचा हस्तक कोण?, डिलिमिटेशनवरून वातावरण तापलं, रोहित पवारांच्या पत्राने खळबळ

डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या चर्चेवरून रोहित पवारांनी सुप्रिया सुळेंना पत्र लिहित पक्षातील नेत्यावर गंभीर आरोप केला आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 29T181848.852

Rohit Pawar Letter to Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत. आमदार रोहित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून या विधेयकाला विरोध करण्याची स्पष्ट भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. या पत्रातून त्यांनी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यासोबतच शरद पवार यांच्या राजकीय प्रतिमेचा मुद्दाही मांडला आहे. विशेष म्हणजे, विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी पक्षातील काही नेत्यांवर दबाव असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे.

शरद पवार यांच्या पुरोगामी विचारसरणीचा आणि राजकीय निष्ठेचा दाखला देत रोहित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचू नये, अशी भावना व्यक्त केली आहे. शरद पवार आजारी असताना त्यांच्या मागे घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमुळे आयुष्यभर जपलेल्या विचारांचा भंग होऊ नये, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. साहेबांच्या निष्ठेवर आणि पुरोगामी प्रतिमेवर कोणताही डाग लागू न देण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचेही त्यांनी सुप्रिया सुळे यांना सांगितले आहे.

पक्षातील काही खासदार आणि आमदार सत्ताधारी पक्षासोबत जाण्याच्या विचारात असल्याने किंवा त्यांना तसे करण्यासाठी भाग पाडले जात असल्याने दबाव निर्माण होऊ शकतो, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. मात्र, ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे; त्यांचे खरे चेहरे जनतेसमोर येऊ द्यावेत, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. संविधानाशी आणि पक्षाच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना स्वाभिमानी जनता पुन्हा निवडून देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

स्टॅलिन यांच्या घराबाहेर काँग्रेस गो बॅकचे फलक! सोनिया-राहुल-खर्गे चेन्नईत दाखल, INDIA आघाडीत मोठी फूट?

या पत्रातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे पक्षातील एका नेत्यावर केलेला अप्रत्यक्ष आरोप. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या चर्चांमुळे सुप्रिया सुळे यांची प्रतिमा खराब होत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांचा चेहरा पुढे करून प्रत्यक्षात पक्षातील भाजपचा हस्तक असलेला नेता मात्र पडद्यामागे शांत बसला आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. या निर्णयामागे नेमका कोणाचा दबाव आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

सुप्रिया सुळे यांच्या मनातही आपल्याप्रमाणेच विचार असल्याचे आपल्याला जाणवले आहे, मात्र त्यांच्यावर दबाव असण्याची शक्यता असल्याचे रोहित पवार यांनी पत्रात नमूद केले आहे. पक्षातील आमदार आणि खासदारांनी दबावापुढे न झुकता संविधानाच्या बाजूने उभे राहण्याचे धाडस दाखवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या विषयावर प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

पक्ष लोकशाहीचा आदर करणारा असल्याने नेत्यांनी आपली मते उघडपणे मांडावीत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. डोळे झाकून राहिल्याने जनतेचे लक्ष आपल्याकडे नाही, असा गैरसमज कोणी करून घेऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी ठाम भूमिका घेतल्यास मतदारांचा विश्वासघात होणार नाही आणि जनतेचे प्रश्नही दुर्लक्षित राहणार नाहीत, असे सांगत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षातील सर्व लोकप्रतिनिधींना डिलिमिटेशन विधेयकाविरोधात स्पष्ट भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.

follow us