APMC Election : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे.
यादरम्यान नाशिक जिल्ह्यातील देखील बाजार समित्यांचे अपडेट समोर येत आहेत. नाशिक मध्ये राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांच्या ताब्यात सत्ता मिळत असल्याचं दिसत असतानाच मंत्री दादा भुसे यांना मात्र धक्का बसत असल्याचं चित्र आहे. मालेगावात दादा भुसे यांना मोठा धक्का बसेल असं चित्र आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण सात बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. सकाळपासून सुरु असलेल्या मतमोजणीमध्ये अनेक ठिकाणचे चित्र आता स्पष्ट होताना दिसत आहे.
Maharashtra APMC Election Result LIVE updates : राज्याच्या कल कोणाकडे? कोण राखणार सत्ता
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) साहेब यांचे वर्चस्व दिसून आले आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 13 जागा मिळवत छगन भुजबळ यांनी आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.
भुजबळ यांच्या यांच्या शेतकरी विकास पॅनेलने दोन अपक्षांसह एकूण 15 जागांवर बाजी मारली आहे. छगन भुजबळ यांना सत्ता मिळत असली तरी विरोधी आमदार दराडे गटाला केवळ 3 जागा मिळाल्या आहेत.
येवला बाजार समितीमध्ये भुजबळ यांना विजय मिळत असला तरी मालेगाव बाजार समितीमध्ये मात्र मंत्री दादा भुसे यांना धक्का बसला आहे. मालेगाव बाजार समितीत सोसायटी गटाच्या 11 जागांची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून यात 11 पैकी 10 जागा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्या महाविकास आघाडी प्रणीत कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलला मिळत असल्याचं चित्र आहे.
मागील 20 वर्षांपासून बाजार समितीवर पालकमंत्री भुसे यांच्या समर्थकांची सत्ता आहे. सोसायटी गटाचा कल लक्षात घेता अद्वय हिरे पालकमंत्री दादा भूसेंना धक्का दिला आहे.