पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचा स्वरप्रवास

आपल्या बहुरंगी, लवचिक आणि भावस्पर्शी आवाजाने त्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील रसिकांना मंत्रमुग्ध केले.

Untitled Design 78

Untitled Design 78

Asha Bhosle’s vocal journey : स्वरांच्या विश्वावर जवळपास आठ दशके अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ आणि दिग्गज गायिका आशा भोसले यांचे रविवारी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या बहुरंगी, लवचिक आणि भावस्पर्शी आवाजाने त्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील रसिकांना मंत्रमुग्ध केले. गझल असो, पॉप असो, शास्त्रीय किंवा चित्रपटसंगीत, प्रत्येक शैलीत त्यांनी स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला.

आशा भोसले यांचा संगीतप्रवास म्हणजे एक प्रेरणादायी गाथाच. अत्यंत लहान वयात त्यांनी गाण्याची सुरूवात केली आणि पुढे हजारो गाण्यांमधून त्यांनी आपली अजरामर ओळख निर्माण केली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तामिळ, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. त्यांच्या आवाजातली तरलता, चपळता आणि भावनांची खोली यामुळे प्रत्येक पिढी त्यांच्यावर प्रेम करत राहिली.

त्यांच्या या अद्वितीय योगदानाची दखल घेत त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. भारत सरकारने त्यांना 2008 साली देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान पदमविभूषण प्रदान केला. यापूर्वी 2000 साली भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना देण्यात आला होता.

त्यांच्या गायकीच्या उत्कृष्टतेसाठी त्यांना दोन वेळा राष्ट्रोय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. 1981 आणि 1986 साली त्यांनी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. त्याचबरोबर फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये देखील त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. सात वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळवण्याचा मान त्यांनी पटकावला. 1996 साली रंगीला चित्रपटातील गाण्यांसाठी त्यांना विशेष पुरस्कार मिळला, तर 2001 मध्ये त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या प्रतिभेची दखल घेतली गेली. 2002 मध्ये लगान चित्रपटासाठी त्यांना आयफा पुरस्कार मिळाला. 1987 साली त्यांना नाईटिंगेल ऑफ एशिया हा सन्मान मिळाला होता. 2000 साली दुबई येथे सिंगर ऑफ द मिलेनियम म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला, तर 2002 मध्ये बीबीसी जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

आशा भोसले यांचा प्रवास हा केवळ एका गायिकेचा नव्हे, तर एका युगाचा इतिहास आहे. त्यांच्या स्वरांनी अनेक दशकं भारतीय संगीताला समृद्ध केलं, भावनांना आवाज दिला आणि प्रत्येक पिढीच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केलं. आज त्या आपल्या सोबत नसल्या, तरी त्यांचा आवाज, त्यांची गाणी आणि त्यांची कला सदैव अमर राहील.

Exit mobile version