एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड; पाऊण तासांच्या बैठकीने वाढवलं गूढ
शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे.
Meeting between Eknath Shinde and Jayant Patil : राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आणणारी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे. विशेष म्हणजे, या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र पाटील देखील उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. या अचानक झालेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितूनुसार, नंदनवन निवासस्थानी ही बैठक तब्बल पाऊण तासांहून अधिक काळ सुरू होती. मात्र या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या भेटीमागे राजकीय समीकरणे आहेत की एखादा स्थानिक अथवा प्रशासकीय विषय, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
या भेटीचे महत्व आणखी वाढण्याचे कारण म्हणजे अवघ्या दोन दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्ष निवासस्थानी भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे देखील वर्ष बंगल्यावर उपस्थित असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे त्या भेटीनंतर देखील राजकीय चर्चांना उधाण आले होते.
CM फडणवीसांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी, पुढील दीड महिन्यात राज्यात मोठे फेरबदल?
दरम्यन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता. इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अपात्रता प्रकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपण मुख्यामंत्र्यांची भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच, आपल्या भेटीचा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीशी कोणताही संबंध नसल्याचे देखील त्यांनी सांगितले होते.
जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आपण रात्री साडेदहा वाजता वर्षा निवासस्थानी पोहोचलो आणि सुमारे पाच मिनिटे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पावणे अकरा वाजता बाहेर पडलो. त्या वेळी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित असल्याची माहिती आपल्याला नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सुरू असलेल्या घडामोडी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तसेच राज्यातील बदलती राजकीय समीकरणे या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे.
नंदनवन येथे झालेल्या या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मात्र, दोन दिवसांत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा दोन्ही प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्याने जयंत पाटील यांच्या राजकीय हालचालींनी राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फोडले आहे.