पाच राज्यांच्या निकालांनी बदलले राजकीय समीकरण; अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सुनावले खडे बोल

त्यांनी सांगितले की, पाचही राज्यांतील निकालांमधून भाजपला मोठे यश मिळाले असून विशेषतः बंगालमधील विजय हा ऐतिहासिक आहे.

Untitled Design 78

Untitled Design 78

Ashok Chavan gave tough words to Congress : देशातील पाच महत्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले आणि या निकालांनी देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली. पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी तामिळनाडू आणि केरळ या पाचही राज्यांमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली होती. दिवस जसजसा पुढे सरकत गेला, तस्यासे स्पष्ट होत गेलेले निकाल अनेक राजकीय समीकरणं बदलणारे ठरले.

या निवडणुकांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते पश्चिम बंगालमधील निकालांनी. येथे भाजपने दणदणीत विजय मिळवत तीन कार्यकाळांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला सत्तेबाहेर ढकलले. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पराभव हा अनेकांसाठी धक्कादायक मानला जात आहे. आसाममध्ये देखी भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखण्याचं यश मिळवले. तर पुद्दुचेरीमध्ये भाजप आघाडी सत्तास्थापनेच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहे. दरम्यान, केरळमध्ये दीर्घकाळ टिकून असलेल्या डाव्या आघाडीच्या सत्तेला मोठा धक्का बसत असून काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तामिळनाडूमध्ये मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. अभिनेता विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाने जोरदार कामगिरी करत द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांना मागे टाकत मुसंडी मारली. या निकालानंतर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, पाचही राज्यांतील निकालांमधून भाजपला मोठे यश मिळाले असून विशेषतः बंगालमधील विजय हा ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखवला आहे. अँटी इन्कम्बन्सीचा मोठा परिणाम या निवडणुकीत दिसून आला, असे देखील त्यांनी नमूद केले.

लाखांचे मताधिक्य घेत अक्षय कर्डिले विजयी…शरद पवारांच्या शिलेदाराचे पानिपत

महिला आरक्षण विधेयकासारख्या मुद्द्यांवर विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि त्याचा फटका त्यांना बसल्याचे देखील चव्हाण यांनी म्हटले. तसेच काँग्रेस पक्षाला त्यांनी नेतृत्वहीन म्हणत आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. भाजपचे आणखी एक नेते विनोद तावडे यांनी देखील या विजयावर प्रतिक्रिया देताना विकासाच्या राजकारणाला जनतेने पसंती दिल्याचे सांगितले. तृष्टीकरणाच्या राजकारणाला नकार देत बंगालमध्ये विकासाच्या मुद्द्यावर मतदान झाले, असे त्यांनी नमूद केले. तसेच आसाममध्ये सत्ता कायम राखणे, तामिळनाडूमध्ये जागा वाढवणे आणि केरळमध्ये मतांची टक्केवारी वाढणे हे भाजपसाठी सकारात्मक संकेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, संजय राऊत यांनी या निकालांवर शंका उपस्थित करत भाजपवर गंभीर आरोप केले. दिवा विझताना मोठा होतो, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी भाजपचा हा विजय तात्पुरता असल्याचं म्हटलं. काही मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत त्यांनी केंद्रीय यंत्रणांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकूणच, या पाच राज्यांच्या निकालांनी देशाच्या राजकारणात नवीन समीकरणे निर्माण केली असून विशेषतः पश्चिम बंगालमधील सत्तांतर हे राष्ट्रीय राजकारणासाठी निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Exit mobile version