Nikam Vs Kharat : 628 जणांना जन्मठेप अन् 37 आरोपींना फाशी; निकम लावणार ‘कॅप्टन’चा निकाल

Ujjwal Nikam 26/11 हल्ल्यातील जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याच्याविरोधात सरकारची बाजू निकम यांनी प्रभावीपणे मांडली.

Nikam Vs Kharat

Nikam Vs Kharat

Advocate Ujjwal Nikam Vs Ashok Kharat: संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने देशातील सर्वात अनुभवी आणि चर्चित सरकारी वकिलांपैकी एक असलेल्या उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आधीच चर्चेत असलेल्या या प्रकरणाचे न्यायालयीन आणि राजकीय महत्त्व आणखी वाढले आहे. दहशतवाद, खून, बलात्कार आणि संघटित गुन्हेगारीच्या गाजलेल्या खटल्यांमध्ये सरकारची बाजू प्रभावीपणे मांडत आरोपींना शिक्षा मिळवून देणारे निकम आता खरात प्रकरणात उतरल्याने या खटल्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पण नेमके हे उज्ज्वल निकम कोण? त्यांनी आतापर्यंत कोणते गाजलेले खटले लढले आणि त्यांच्या कारकिर्दीची वाटचाल कशी राहिली, याचा हा आढावा…

भुजबळ ‘कबड्डीपटू’, पटेल ‘फुटबॉलपटू’ तर, मुश्रीफ ‘कुस्तीपटू; तटकरेंनी दिलेल्या उपमांचे अर्थ काय?

जळगावच्या कोर्टातून देशातील सर्वात मोठ्या खटल्यांपर्यंत

30 मार्च 1953 रोजी जळगाव येथे जन्मलेल्या उज्ज्वल निकम यांना कायद्याचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचे वडील देवराव निकम हे न्यायाधीश आणि बॅरिस्टर होते. विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी जळगावमधील एस. एस. मनियार लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. वकिलीची सुरुवात त्यांनी जळगावमध्ये केली. जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना गुन्हेगारी खटल्यांमधील त्यांची तयारी, पुराव्यांचा अभ्यास आणि न्यायालयातील आक्रमक मांडणी यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. जिल्हा न्यायालयातील खटल्यांपासून सुरू झालेला हा प्रवास पुढे देशातील सर्वाधिक संवेदनशील आणि चर्चित प्रकरणांपर्यंत पोहोचला. आज उज्ज्वल निकम हे भारतातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले सरकारी वकील म्हणून ओळखले जातात.

628 जन्मठेप अन् 37 आरोपींना फाशी

सरकारी वकील म्हणून तीन दशकांहून अधिक काळ काम करताना निकम यांनी अनेक गुन्हेगारी खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी 628 आरोपींना जन्मठेप आणि 37 आरोपींना फाशीची शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सरकारी वकील म्हणून हा आकडा अत्यंत उल्लेखनीय मानला जातो. कायद्याच्या क्षेत्रातील योगदानाची दखल घेत भारत सरकारने 2016 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले. तर संवेदनशील खटल्यांमधील भूमिकेमुळे त्यांना Z+ दर्जाची सुरक्षा देखील देण्यात आली आहे.

Video : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर आक्रमक; अनेक दिवसांनंतर मांडली सविस्तर भूमिका

देश हादरवणाऱ्या खटल्यांचा चेहरा

उज्ज्वल निकम यांचे नाव घेतले की सर्वप्रथम आठवतो तो 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा खटला. संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या या हल्ल्यातील जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याच्याविरोधात सरकारची बाजू निकम यांनी प्रभावीपणे मांडली. अखेर कसाबला फाशीची शिक्षा झाली आणि ती अंमलातही आली. त्याआधी 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील हा सर्वात मोठ्या आणि गुंतागुंतीच्या खटल्यांपैकी एक मानला जातो. याशिवाय त्यांनी अनेक गाजलेल्या प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून काम पाहिले. त्यामध्ये गुलशन कुमार हत्या प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, खैरलांजी हत्याकांड, शक्ती मिल्स सामूहिक बलात्कार प्रकरण, कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण, प्रीती राठी ॲसिड हल्ला प्रकरण, पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरण, मरीन ड्राइव्ह बलात्कार प्रकरण यांसारख्या देशभर चर्चेत राहिलेल्या खटल्यांचा समावेश आहे.

राजकारणात प्रवेश; पण न्यायालयाशी नाळ कायम

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने त्यांना मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर कायद्याच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत राष्ट्रपतींनी 2025 मध्ये त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली. लोकसभा निवडणूक लढवताना त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून हाताळत असलेल्या 29 प्रकरणांचा राजीनामा दिला होता. मात्र सार्वजनिक जीवनात सक्रिय असतानाही त्यांची न्यायव्यवस्थेशी असलेली नाळ कायम राहिली.

हॉर्मोनल लोचा की, भावनिक कोंडी? खरातच्या ओशनो जल अन् पेढ्यामुळे महिलांचे देहभान का हरपायचे?

सध्या कोणती प्रकरणे हाताळत आहेत?

2025 आणि 2026 मध्ये महाराष्ट्र सरकारने काही संवेदनशील प्रकरणांसाठी पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. उपलब्ध माहितीनुसार, सध्या निकम बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, मालेगाव अल्पवयीन मुलगी बलात्कार-हत्या प्रकरण, अरुण टिक्कू हत्या प्रकरण यांसारख्या महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत. आता या यादीत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचीही भर पडली आहे. मात्र सध्या त्यांच्या ताब्यात नेमकी किती प्रकरणे आहेत, याचा अधिकृत आकडा सरकारकडून जाहीर करण्यात आलेला नाही.

खरात प्रकरणात निकमांची नियुक्ती का महत्त्वाची?

अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती ही केवळ एका सरकारी वकिलाची नियुक्ती म्हणून पाहता येणार नाही. तर या प्रकरणात सरकार गंभीर असून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च पातळीवर प्रयत्न केले जात असल्याचा तो संदेश मानला जात आहे. खरात प्रकरणात आरोपांचे स्वरूप, समाजातील निर्माण झालेली प्रतिक्रिया आणि तपास यंत्रणांसमोर असलेली आव्हाने लक्षात घेता, न्यायालयात प्रत्येक पुरावा आणि प्रत्येक साक्ष महत्त्वाची ठरणार आहे. अशा परिस्थितीत 26/11, कोपर्डी आणि अनेक गाजलेल्या खटल्यांचा अनुभव असलेले निकम सरकारसाठी मोठी ताकद ठरू शकतात. या प्रकरणात तपास यंत्रणा कोणते आता पुरावे सादर करते, साक्षीदारांची मांडणी कशी होते आणि न्यायालयीन प्रक्रियेत सरकारी पक्ष किती प्रभावीपणे बाजू मांडतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version