ब्रेकिंग : खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांची पुण्यात बदली; कराळेंचीही बदली
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे.
IPS Tejaswi Satpute Transfer : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे. सातपुते यांची अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर पदोन्नतीने बदल करण्यात आली आहे. याशिवाय खरात सोबत फोटो असलेले नाशिकचे IG दत्ता कराळे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य मानवी आयोग या विभागात बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गृहविभागाकडून जारी करण्यात आले आहे. राज्यातील पोलीस दलातील 24 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये नाशिकमधील पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांचाही समावेश आहे. दत्ता कराळे यांची राज्य मानवी हक्क आयोगात बदली करण्यात आली आहे. राज्य मानवी हक्क आयोगात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक खरात प्रकरणातील आरोप त्यांना भोवल्याची चर्चा आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी
| अ.क्र. | अधिकारी | सध्याचे पद (Current Post) | बदली / नवीन पदस्थापना (Transferred / New Post) |
|---|---|---|---|
| 1 | कृष्ण प्रकाश | अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन | अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) |
| 2 | दत्ता कराळे | विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र | विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य मानवी हक्क आयोग |
| 3 | प्रविण पडवळ | विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण | विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र |
| 4 | लखमी गौतम | पोलीस सह आयुक्त (गुन्हे), बृहन्मुंबई | विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य |
| 5 | मनोज शर्मा | विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य | पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), बृहन्मुंबई |
| 6 | सुनील हक | विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) | पोलीस सह आयुक्त (प्रशासन), मुंबई |
| 7 | महेश पाटील | अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई | विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) |
| 8 | परमजीत दहिया | अपर पोलीस आयुक्त, मुंबई | विशेष पोलीस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक |
| 9 | सी. के. मीना | विशेष पोलीस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक | विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र |
| 10 | संजय दराडे | विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण parिक्षेत्र | पोलीस सह आयुक्त, पुणे |
| 11 | रंजन शर्मा | पोलीस सह आयुक्त, पुणे | विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र |
| 12 | सुनील फुलारी | विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र | विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व) |
| 13 | राजेश प्रधान | पदस्थापनेच्या प्रतीक्षेत | पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, मुंबई |
| 14 | विविश मिश्रा | पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, मुंबई | विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण |
| 15 | जय कुमार | पोलीस सह आयुक्त (प्रशासन), मुंबई | विशेष पोलीस महानिरीक्षक, फोर्स वन |
| 16 | संजय येडपुरे | पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई | विशेष पोलीस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा |
| 17 | संजय जाधव | अपर पोलीस आयुक्त, ठाणे | अपर पोलीस आयुक्त, ठाणे (In Situ Promotion) |
| 18 | दीपक साकोरे | अपर पोलीस आयुक्त, नवी मुंबई | पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई |
| 19 | पंजाबराव उगले | अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), ठाणे | विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस गृह निर्माण महामंडळ |
| 20 | एस. व्ही. पाठक | अपर पोलीस आयुक्त (प्रशासन), ठाणे | विशेष पोलीस महानिरीक्षक (आर्थिक गुन्हे), पुणे |
| 21 | विनायक देशमुख | अपर पोलीस आयुक्त, ठाणे | नियंत्रक, वैधमापन |
| 22 | ज्योती प्रिया सिंह | पदस्थापनेच्या प्रतीक्षेत | विशेष पोलीस महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक |
| 23 | अनिल कुंभारे | पोलीस सह आयुक्त, वाहतूक, मुंबई | पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मुंबई |
| 24 | सत्य नारायण चौधरी | पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), मुंबई | पोलीस सह आयुक्त, वाहतूक, मुंबई |
तेजस्वी सातपुते यांच्या बदलीचे आदेश – 202605151739599429
चष्मा लागला अन् पायलट होण्याचं स्वप्न भंगलं
तेजस्वी सातपुते यांचं बालपणापासूनचं स्वप्न होतं ‘पायलट’ होण्याचं. पण चष्मा लागला आणि स्वप्न भंगलं. मात्र, त्यांनी हार मानली नाही. बायोटेक्नॉलॉजी आणि एलएलबी पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससीचा मार्ग निवडला. पहिल्या प्रयत्नात अपयश आलं, पण जिद्द सोडली नाही. ‘स्कोरिंग’ विषयामागे न धावता, स्वतःला आवडणाऱ्या मराठी आणि इतिहास विषयाच्या जोरावर त्यांनी आयपीएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्या 2012 बॅचच्या धडाकेबाज आयपीएस अधिकारी आहेत. सातपुते या केवळ ‘कडक’ शिस्तीच्या अधिकारी नाहीत, तर त्या ‘सॉफ्ट पोलीसिंग’मध्येही माहीर आहेत.
पुण्यात जेव्हा त्या डीसीपी होत्या, तेव्हा फक्त 20 टक्के लोक हेल्मेट वापरायचे. त्यांनी दंड करण्याऐवजी सुरुवात स्वतःच्या पोलीस प्रशासनापासून केली. हेल्मेट नसलेल्या पोलिसांना पोलीस आयुक्तालयात एन्ट्री नाकारली जाईल तसेच चलानदेखील कापले जाईल असे जाहीर केलं. याशिवाय हेल्मेटसाठी त्यांनी आणखी एक प्रयोग केला होता. ज्यात त्यांनी हेल्मेट घालून आणि हेल्मेट न घालता ठराविक अंतर पार करण्यास दोन व्यक्तींना सांगितले. त्यानंतर त्यांनी एक प्रश्न विचारला की, विनाहेल्मेट प्रवास पूर्ण केल्यावर वेळेत केवळ 4 मिनिटांचा फरक पडला. अशावेळी फक्त 4 मिनिटांसाठी प्राणाचा धोका पत्करणे योग्य आहे का?, की हेल्मेट घालून सुरक्षितपणे जाणे? त्यांच्या या प्रयत्नाचा लोकांवर सकारात्मक परिणाम झाला आणि पुण्यात हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या 20 टक्क्यांवरून थेट 80 टक्क्यांपर्यंत पोहोचली. अनेकदा आपण समोरच्या व्यक्तीने आपला दृष्टिकोन बदलावा अशी अपेक्षा करतो; मात्र जर आपण सुरुवात स्वतःपासून केली, तर पुढचे मार्ग आपोआप सोपे होतात असे सातपुते नेहमी सांगतात.
सोलापूरचा अवैध धंदा मुळासकट उपटून काढला
2012 बॅचच्या आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची ऑक्टोबर 2020 मध्ये सोलापूर (ग्रामीण) पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली, तेव्हा आपल्याला कामाची सुरुवात नेमकी कुठून करायची आहे, हे त्यांना पक्के ठाऊक होते. सात वर्षांपूर्वी, एक प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी म्हणून त्यांनी या भागात दोन आठवड्यांहून अधिक काळ घालवला होता. त्या काळातच त्यांनी या भागातील सर्वात मोठी समस्या म्हणजे अवैध दारू हे ओळखले होते. जेव्हा सातपुते यांनी सोलापूरच्या एसपी पदाची धुरा सांभाळली, तोपर्यंत या जिल्ह्याची ओळख बीड, धाराशीव आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमेला लागून असलेल्या किमान नऊ जिल्ह्यांना अवैध दारू पुरवणारा मुख्य सप्लायर म्हणून झाली होती. नियुक्तीच्या सुरुवातीचे काही महिने त्यांनी हा अवैध धंदा किती खोलवर पसरला आहे, हे समजून घेण्यात घालवले. त्यानंतर, सप्टेंबर 2021 मध्ये त्यांनी ‘ऑपरेशन परिवर्तन’ ला सुरुवात केली. ही एक चार-सूत्रीय कार्ययोजना होती, ज्यामध्ये जिल्ह्यातील हातभट्ट्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच, गुन्हेगारांचे समुपदेशन करण्यासारख्या सॉफ्ट पोलीसिंग पद्धतींचाही समावेश करण्यात आला होता.