‘लाख रुपये दे, नाहीतर नोकरी घालवेन’; अशोक खरात प्रकरणातील पत्रकाराकडून महिला अधिकाऱ्याकडे खंडणीची मागणी
Dattatray Khemnar Extortion Case अशोक खरात प्रकरणातील पत्रकार दत्तात्रय खेमनार याच्यावर महिला अधिकाऱ्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप.
Dattatray Khemnar Extortion Case: अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणामुळे चर्चेत आलेले पत्रकार दत्तात्रय पोपट खेमनार (Dattatray Khemnar) पुन्हा एका प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात फत्त्याबाद येथे स्मशानभूमीच्या विकासकामावरून 1 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात खंडणी, शासकीय कामात अडथळा, ॲट्रॉसिटी, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी खेमनार यांना अटक केली आहे.
निवडणूक आयोग अन् एसआयआरविरूद्ध ठाकरे बंधूंचा एल्गार! 4 ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा
फत्त्याबाद ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी माधवी नामदेव पलघडमल (वय 45) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्या 2022 पासून फत्त्याबाद ग्रामपंचायतीत कार्यरत आहेत. तक्रारीनुसार, गावातील स्मशानभूमीत मुरूम टाकून जमीन समतल करण्याचे शासकीय काम सुरू असून, याच कामावरून खेमनार गेल्या काही दिवसांपासून त्यांना फोन करत होते.
तक्रारीनुसार, स्वतः पत्रकार असल्याचे सांगत खेमनार यांनी 1 लाख रुपये देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास स्मशानभूमीचे काम बंद पाडण्यासोबतच खोट्या प्रकरणात अडकवून नोकरी घालवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमक्यांमुळे 14 सप्टेंबर रोजी महिला अधिकाऱ्याने 1,100 रुपये ऑनलाइन पाठवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही पैशांची मागणी सुरूच राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, 24 सप्टेंबर रोजी सकाळी स्मशानभूमीत JCBच्या मदतीने मुरूम समतल करण्याचे काम सुरू असताना खेमनार कारमधून घटनास्थळी आले. त्यांनी कामगार सागर चांदे आणि संकेत पाडेकर यांना शिवीगाळ करून काम थांबवण्यास सांगितल्याचा आरोप आहे. याशिवाय मुरूम पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडूनही पैसे घेतल्याची माहिती तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले आहे.
महिला अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, खेमनार यांनी धमकी देताना “मी भल्या-भल्यांना कामाला लावतो, मला स्मशानभूमीच्या कामात 1 लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर तुला काम करू देणार नाही, खोट्या केसमध्ये अडकवून तुझी नोकरी घालवेन,” असे म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
एशियन गेम्समध्ये भारतीय महिला कबड्डी संघाला गोल्ड मेडल, फायनलमध्ये 37-34 ने इराणचा पराभव
या तक्रारीच्या आधारे लोणी पोलिसांनी दत्तात्रय पोपट खेमनार यांच्याविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांना रात्री अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास लोणी पोलीस करत आहेत.