श्रीरामपुरमधील गुन्हेगारांचा ‘तो’ आका कोण ? लोकप्रतिनिधीही नाव घ्यायला घाबरतायत…
Shrirampur: Shrirampur: किरकोळ कारणावरून एकाची थेट हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे जिल्ह्यात पोलिसांचा धाक आहे की नाही ? असा सवाल उपस्थित झाला आहे.
अहिल्यानगर – गेल्या काही महिन्यांपासून श्रीरामपूर (Shrirampur) शहरामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. यातच किरकोळ कारणावरून एकाची थेट हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे जिल्ह्यात पोलिसांचा धाक आहे कि नाही ? तसेच या गुंडाना कोणाचे पाठबळ आहे? पोलीस प्रशासन थेट कारवाई करण्यास धजावत का नाही? वाढती गुन्हेगारी व या गुंडाना राजकीय वरदहस्त असल्याच्या दबक्या आवाजात सुरु असलेल्या चर्चा खऱ्या आहेत का ? असे अनेक सवाल आता समोर येत आहे. यातच श्रीरामपूरमधील झालेल्या खुनाच्या घटनेनंतर ‘तो’ आका आहे तरी कोण ज्याचं नाव घ्यायला कोणी धजावत नाही. यामुळे या घटनेमागचा खरा सूत्रधार कोण याबाबतच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
दिवसाढवळ्या व्यावसायिकाची निर्घृण हत्या
श्रीरामपूर शहरातील नेवासा रस्त्यावरील लक्ष्मीनारायण या हॉटेल येथे शनिवारी दुपारच्या सुमारास किरकोळ कारणावरून तिघा मद्यधुंद तरुणांनी हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबय्या (वय ३४) यांची निर्घृण हत्या केली. या धक्कादायक हत्याकांडामुळे संपूर्ण श्रीरामपूर शहराला जबर धक्का बसला. या घटनेने शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि ढासळती कायदा-सुव्यवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आणली आहे.
‘तो’ आका कोण ? लोकप्रतिनिधीही नाव घ्यायला घाबरतायत
श्रीरामपूर मध्ये गुन्हेगारी वाढते आहे, वाळूतस्करी यामुळे गुंडाची दहशत थेट गोळीबार अशा घटना घडू लागल्यात. दरम्यान आकाश दुबय्या यांच्या खुनानंतर सर्वांच्या तोंडातून त्या ‘आका’ वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होते आहे. मात्र धक्कादायक म्हणजे तो आका नेमका कोण त्याचे नाव मात्र कोणी घेण्यास तयार नाही. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी यांनी देखील त्याचे नाव घ्यायचे टाळले, सर्वाना माहिती आहे तो कोण आहे असे आमदार ओगले म्हणाले. त्याचबरोबर श्रीरामपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष करण ससाणे यांनी देखील आरोपीचे उघडपणे नाव घेण्याचे टाळले. यावरूनच श्रीरामपूर मध्ये त्या ‘आका’ ची दहशत किती आहे यावरून अधोरेखित होते आहे.
अकरा दिवसात चार जीवघेणे हल्ले
शांत व सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेले श्रीरामपूरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरश वाभाडे निघाले आहे. कारण अवघ्या 11 दिवसांमध्ये 4 जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहे. यामुळे पोलीस प्रशासन नेमकं काय काम करते आहे ? तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री असताना गृहमंत्र्यांच्या दरबारी हा विषय का मार्गी लागत नाही. पोलीस प्रशासनाकडून या गुंडाना पाठबळ मिळत असल्याची उघड भूमिका नगराध्यक्ष करण ससाणे यांनी मांडली आहे. यामुळे या वाढत्या गुन्हेगारीला खतपाणी घालण्याचे काम पोलीस प्रशासनच करते का ? असा सवाल जनतेमधून येतो आहे. रक्षकच भक्षक बनत असतील तर या घटनांना आळा कोण घालणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाढती गुन्हेगारी ‘ही’ आहेत कारणे
श्रीरामपूर शहर व जवळपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंधे हे फोफावले आहे. नशायुक्त पदार्थांची मोठी तस्करी, गावठी दारूच्या भट्ट्या , अमली पदार्थांची मोठी तस्करी, वाळूतस्कर, जुगाराचे अड्डे जोरदार सुरु आहे. पोलिसांच्या डोळ्या देखत हे सुरु असून देखील यावर कोणतेही आक्रमक कारवाईचे पाऊल न उचलल्याने शहरातील गुन्हेगारी ही वाढू लागली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ड्रग्सचे सेवन हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी हेमंत ओगले यांनी थेट अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला. तसेच या गुंडांवर मकोका अंतर्गत कारवाईची देखील मागणी केली. मात्र निष्क्रिय पोलीस प्रशासन व राजकीय वरदहस्त यामुळे या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्याचे पाहायला मिळले. यातच या घटनेचा व वाढत्या गुन्हेगारीचा आकाश हा बळी ठरल्याचा आता बोलले जाऊ लागले आहे.