196 देश अन् फिजी; सिस्पे घोटाळ्यातील मास्टरमाइंड राहुल कोळोखे कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात?
rahul kalokhe: तपासादरम्यान राहुल काळोखे याच्याविरोधात जानेवारी महिन्यात इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.
अहिल्यानगर : सिस्पे घोटाळ्याप्रकरणी अनेक दिवसांपासून फरार असलेला आणि या प्रकरणातील मास्टरमाइंड म्हणून तपास यंत्रणांकडून शोध घेतला जात असलेला राहुल श्यामराव काळोखे याला अखेर इंटरपोलच्या मदतीने फिजीमध्ये ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्याला भारतात आणण्यात आले. मुंबई विमानतळावर त्याला अटक करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. (ahilyanagar-sispe-scam-prime-accused-rahul-kalokhe-extradited)
तपासादरम्यान राहुल काळोखे याच्याविरोधात जानेवारी महिन्यात इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. या नोटीसमुळे जगभरातील 196 देशांच्या कायदा अंमलबजावणी यंत्रणांना त्याचा शोध घेण्यासाठी अधिकृत माहिती पाठविण्यात आली. त्यानंतर तो फिजीमध्ये असल्याची माहिती समोर आल्यानंतर तेथील संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि भारतात प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय समन्वयानंतर राहुल काळोखे याला भारतात आणण्यात आले. आज दुपारी मुंबई विमानतळावर त्याच्यावर अधिकृतपणे अटकेची कारवाई करण्यात आली. पुढील चौकशीसाठी त्याला संबंधित तपास यंत्रणांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, इतर आरोपींची भूमिका आणि घोटाळ्याचे संपूर्ण जाळे उघड करण्यासाठी त्याची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरुवातीपासून सातत्याने पाठपुरावा केला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी समन्वय साधत आवश्यक स्तरावर पत्रव्यवहार करून तपास प्रक्रियेला गती मिळावी यासाठी प्रयत्न केले. या पाठपुराव्यानंतर विविध तपास यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावी झाले, त्यातून आरोपीचा माग काढून त्याच्यापर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे.
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), केंद्रीय गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, इमिग्रेशन विभाग आणि इंटरपोल या सर्व संस्थांनी परस्पर समन्वय साधत काम केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहितीची देवाणघेवाण, कायदेशीर प्रक्रिया आणि सुरक्षा यंत्रणांचा समन्वय यामुळे आरोपीला भारतात आणणे शक्य झाले.
राहुल काळोखेच्या अटकेनंतर सिस्पे घोटाळ्यातील तपास अधिक वेगाने पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे आर्थिक फटका बसलेल्या हजारो पीडितांना न्याय मिळण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे. तसेच या घोटाळ्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींची भूमिका, आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे आणि संभाव्य नवीन खुलासे तपासातून समोर येण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.