Bachchu Kadu’s determination : माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रथमच अमरावती दौरा केला. त्यांच्या स्वागतासाठी अमरावती शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर चांदुर बाजार आणि परतवाडा येथे देखील कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. या दौऱ्यात बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले आणि एकनाथ शिंदे यांच्यावरील आपला विश्वास पुन्हा एकदा स्पष्ट केला.
कार्यकर्त्यांसमोर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मी आजवर एकटाच संघर्ष करत आलो. जनतेने मला पराभूत केले नसते, तर कदाचित मला दुसऱ्या नेतृत्वाचा आधार घ्यावा लागला नसता. पण जनतेच्या निकालानंतर आम्ही ज्या नेतृत्वाला स्वीकारले, ते कुठलेही सामान्य नेतृत्व नाही. शब्द पाळणारे, कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणारे एकनाथ शिंदे यांना आम्ही नेता मानले आहे. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती अचानक खालावली; पुढील उपचारांसाठी तातडीने पुण्याला रवाना
एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना बच्चू कडूंनी सांगितले की, रात्री दोन वाजता देखील कार्यकर्त्यांसाठी दार उघडून उभे राहणारे नेते म्हणजे एकनाथ शिंदे. त्यांनी सामान्य माणसांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. आम्ही भगवा खांद्यावर घेतला आहे आणि या विचारासाठी लढत राहणार आहोत. दिव्यांगांसाठी करण्यात आलेल्या कामांचा उल्लेख करत बच्चू कडू म्हणाले की, देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. कोणत्याही जाती-धर्माचा विचार न करता दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण ताकद त्यांनी दाखवली. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयामध्ये देखील त्यांचा मोठा वाट होता. आम्ही शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी लढणारे लोक आहोत आणि त्या लढ्यातून कधीही मागे हटणार नाही.
यावेळी बच्चू कडूंनी अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्ष टीका देखील केली. आमचे कुणाशी वैर नाही. फालतू लोकांशी भांडण्यात आम्हाला रस नाही. आम्ही समाजातील वंचित, शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे लोक आहोत, असे म्हणत त्यांनी आपल्या विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला. काही दिवसांपूर्वी प्रवीण तायडे यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात बच्चू कडूंवर टीका केली होती. मात्र त्यावर बच्चू कडूंनी संतुलित प्रतिक्रिया देत राजकीय संयम दाखवला.
