Bansode expressed the sentiments of the workers : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत या चर्चांना नव्याने उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी महत्त्वपूर्ण विधान करत पक्षातील घडामोडींवर प्रकाश टाकला आहे. बनसोडे यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण झाले, तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये मोठा उत्साह निर्माण होईल. जिल्हाध्यक्ष, आमदार आणि प्रमुख कार्यकर्त्यांचीही हीच भावना असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाबद्दलही आदर व्यक्त केला. शरद पवार आमच्यासाठी दैवत आहेत. 1999 पासून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो आहोत. त्यांचा अनुभव मोठा आहे आणि तो सर्वांना मान्य आहे, असे बनसोडे म्हणाले. मात्र, सध्याच्या परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेली जबाबदारी त्या सक्षमपणे पार पाडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विलीनीकरणाबाबत बोलताना त्यांनी असेही स्पष्ट केले की, अजित पवार यांनी यापूर्वी कधीही अशा चर्चेला सुरुवात केली नव्हती. पण आता परिस्थिती बदलली असून, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात योग्य निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येईल का, या प्रश्नावर बोलताना बनसोडे यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणतीही भूमिका घेण्यास हरकत नाही. सर्वसामान्य नागरिकांचीही इच्छा आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात.
विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोपांना त्यांनी फेटाळून लावले. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, सुनेत्रा पवार निर्णय घेण्यात कमी पडत आहेत का, या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, त्या नुकत्याच कारभार सांभाळत आहेत. त्या सर्वांचा विचार करूनच निर्णय घेतात.
दरम्यान, जय पवार यांच्या पत्रकार परिषदेला अडथळा आणल्याच्या चर्चांबाबत विचारले असता, याबाबत मला माहिती नाही, असे सांगत त्यांनी यावर भाष्य टाळले. एकूणच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, पुढील काही दिवसांत या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
