Baramati by-elections in full swing : राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. काँग्रेसने या निवडणुकीतून अधिकृत माघार घेतली असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेत असल्याची घोषणा केली. या निर्णयामागे अनेक राजकीय घडामोडी कारणीभूत असल्याचं समोर समोर आलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी फोन करून विनंती केल्याचं सपकाळ यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांनी सकाळी भेट घेतल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील सूचक सल्ला दिल्याचा उल्लेख करत काँग्रेसने माघार घेतल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी पार्थ पवार यांच्या वक्तव्यावर देखील टीका करत त्यांचे कान टोचले. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात घडामोडी घडल्या. एकूण 53 उमेदवारांपैकी तब्बल ३० जणांनी आपले अर्ज मागे घेतले. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी देखील अर्ज मागे घेतला. गुरुवारी 6 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आज आणखी 24 जणांनी अर्ज मागे घेतल्याने अंतिम लढत 23 उमेदवारांमध्ये रंगणार आहे.
या निवडणुकीत बिग बॉस फेम अभिजित बिचकुले आणि करुणा मुंडे शर्मा यांचे अर्ज कायम राहिल्यामुळे राजकीय रंगत अधिक वाढली आहे. विशेष म्हणजे, अर्ज, मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हे दोघे देखील बारामतीत उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांनी माघार घेतली नाही. काँग्रेसच्या माघारीनंतर देखील निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता संपूष्टात आली असून आता बारामतीत मतदान होणार हे निश्चित झालं आहे. 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे.
30 मार्च 2026 रोजी राहुरी बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांसाठी अधिसूचना जारी झाली, ६ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्यात आले, 7 एप्रिल रोजी छाननी झाली, तर 9 एप्रिल ही अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत होती. मतदान 23 एप्रिलला होणार असून 4 मे रोजी मतमोजणी आणि ६ मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 40 स्टार प्रचारकांनी यादी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. एकूणच काँग्रेसच्या माघारीनंतर बारामती पोटनिवडणुकीत चित्र बदललं असलं तरी लढत अजून देखील बहुरंगी राहणार असून 23 उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
