Beed Railway Test : गेल्या कित्येक वर्षांचं बीडकरांचं रेल्वेमार्गाचं स्वप्न आता पूर्णत्वास येत आहे. त्याच अनुषंगाने बीडपर्यंत धावत असलेल्या रेल्वेच्या मार्गातील विघनवाडी ते राजुरीपर्यंत रेल्वे चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. (Railway) त्यामुळे, लवकरच बीडपर्यंत रेल्वे धावणार असून कित्येक वर्षांचं बीडकरांचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
नगर-बीड-परळी-वैजनाथ रेल्वे मार्गासाठी २७५ कोटींची तरतूद, सुजय विखेंची माहिती
बीडवासीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या रेल्वेची चाचणी काल बीड जवळील राजुरीपर्यंत करण्यात आली. खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत ही चाचणी झाली असून रेल्वेच्या अधिकाऱ्यांना यापुढील रेल्वे मार्गाबाबत खासदार सोनवणे यांनी काही सूचना केल्या आहेत. शिरुर तालुक्यातील विघनवाडी ते बीडजवळील राजुरीपर्यंत ही पहिली चाचणी केली गेली.
रेल्वे कृती समितीने यासाठी खूप मोठा लढा घेतला होता. ह्या लढ्याच फळ आणि स्वप्न पूर्ण करण्याचं काम माझ्या काळात पूर्ण होत आहे. आज राजुरीपर्यंत ही चाचणी झाली असून 26 जानेवारीपर्यंत रेल्वे बीड पर्यंत रेल्वे येणार असल्याचा शब्द मी पूर्ण केल्याचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी यावेळी बोलताना म्हटलं.
सुरुवातील आष्टी ते अंमळनेर या 30 किलोमीटरच्या मार्गावर 110 किमी प्रति तास या वेगाने हायस्पीड रेल्वे चाचणी यशस्वी झाली होती. त्यावेळीही, पहिल्यांदाच आपल्या गावात रेल्वे दाखल झाल्याने अंमळनेरकरांनी आनंद व्यक्त केला होता. रेल्वे पाहण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने अनेकांनी बोगीत बसून फोटो काढले होते. रेल्वे पाहण्यासाठी अंमळनेरसह परिसरातील ग्रामस्थांनी स्टेशनवर मोठी गर्दी केली होती.
तिथून बीडचे अंतर 70 किमीच राहिले होते, आता राजुरीपर्यंतची रेल्वे चाचणी पूर्ण झाल्याने पुढील काही दिवसांतच बीडपर्यंत रेल्वे धावणार आहे. बीडकरांच्या लोहमार्गाची स्वप्नपूर्ती आता प्रत्यक्षात येत आहे. दरम्यान. आजही राजुरी रेल्वे स्थानकाजवळ बीडकरांनी रेल्वे चाचणी पाहायला गर्दी केली होती, यावेळी अनेकांनी धावत्या रेल्वे इंजिनसोबत फोटोही काढले आहेत.