बीड जिल्ह्यातील दादाहरी वडगाव येथे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी समोर आली. या घटनेनंतर बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शिवाजीराव शिंदे यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत सुरुवातीपासूनच चर्चा सुरू होती.
या प्रकरणात आता त्यांचा मुलगा आशुतोष शिंदे याने पोलिसांकडे दाखल केलेल्या फिर्यादीत आत्महत्येच्या कारणाबाबत माहिती दिली आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या फिर्यादीनुसार, शेतातील सततच्या नापिकीला कंटाळून शिवाजीराव शिंदे यांनी आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नापिकी आणि शेतीतील आर्थिक अडचणी या दिशेनेही पोलिसांकडून तपास केला जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणातील अधिक माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
शिवाजीराव शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख होते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येची बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर दादाहरी वडगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मी चुकलो, मला माफ करा; हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी का मागितली माफी?
विशेष म्हणजे आत्महत्येच्या घटनेच्या काही महिन्यांपूर्वी शिवाजीराव शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. मे 2026 मध्ये परळी शहरातील त्यांच्या मालकीच्या हॉटेलमध्ये एका युवकाने धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात शिंदे गंभीर जखमी झाले होते. हॉटेलमधील उपस्थितांनी हल्लेखोराला पकडून रोखल्याने पुढील अनर्थ टळला होता.
हल्ल्यानंतर शिवाजीराव शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या घटनेबाबत काही गंभीर आरोप केले होते. सुरवसे नावाच्या युवकाची आपली वैयक्तिक ओळख नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्याचा आपल्या मुलासोबत काहीतरी वाद झाल्याचं समजल्याचंही शिंदे यांनी म्हटलं होतं. संबंधित युवकाने घरासमोर शिवीगाळ केली आणि त्यानंतर हॉटेलमध्ये येऊन कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला होता. हॉटेलमधील पैसे लुटल्याचाही दावा त्यांनी त्यावेळी केला होता.
आता शिवाजीराव शिंदे यांच्या आत्महत्येनंतर काही महिन्यांपूर्वी झालेल्या या हल्ल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आत्महत्येचा आणि या हल्ल्याचा परस्पर काही संबंध आहे का, याबाबत सध्या कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. पोलिसांकडून फिर्याद, शवविच्छेदन अहवाल आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे तपास सुरू असून, या तपासातून आत्महत्येचं नेमकं कारण आणखी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
