मी चुकलो, मला माफ करा; हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी का मागितली माफी?
Panjabrao Dakh : हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी आज एक पोस्ट करत माफी मागितली आहे. त्यांनी का माफी मागितली आहे?
महाराष्ट्रातील शेतकरी हवामानाच्या अंदाजांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. पेरणीपासून पिकांच्या नियोजनापर्यंत हवामानाचा अंदाज महत्त्वाची भूमिका बजावतो. अशातच परभणी जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी परिचित असलेले पंजाबराव डख यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून यंदाच्या पावसाबाबत भाष्य केलं आहे. 2026 मध्ये आपले अंदाज चुकल्याची कबुली देत त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली असून, राज्यात दुष्काळ पडणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर शेतकऱ्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत.
राज्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतीसमोर गंभीर संकट निर्माण झालं आहे. अनेक भागांत पेरण्या झाल्यानंतर पिकांना पुरेसा पाऊस मिळाला नाही. त्यामुळे उभी पिकं अडचणीत आली असून शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्य सरकारने 75 टक्के राज्यात दुष्काळ जाहीर केल्याचं या बातमीत नमूद करण्यात आलं आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मदत आणि उपाययोजनांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हवामान अंदाज : डख यांचा अभ्यास आहे तरी कसा?
पावसाळा सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांचं लक्ष हवामान विभागासह विविध हवामान तज्ज्ञांच्या अंदाजांकडे असतं. पाऊस कधी पडणार, किती पाऊस होणार आणि कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे, यावर शेतकरी शेतीचं पुढचं नियोजन करत असतात. त्यामुळे अंदाज चुकल्यास त्याचा थेट परिणाम शेतीच्या नियोजनावर होतो. पंजाबराव डख यांच्या पोस्टनंतर याच मुद्द्यावरून काही शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. एका शेतकऱ्याने त्यांच्या अंदाजांवर विश्वास ठेवून महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आल्याचा आरोप करत, आता तरी अंदाज देणं थांबवण्याची मागणी केली आहे.
दुसऱ्या एका शेतकऱ्यानेही डख यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना यंदा पाऊस कमी राहण्याचे अंदाज यापूर्वीच काही माध्यमांतून व्यक्त होत होते, असं म्हटलं आहे. मात्र, वारंवार पावसाच्या तारखा सांगितल्याने अनेक शेतकऱ्यांनी त्यानुसार शेतीसाठी खर्च केल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा किमान 50 हजार रुपयांपर्यंत खर्च झाल्याचंही त्याने म्हटलं असून, पावसाबाबतचा अंदाज आधीच स्पष्ट झाला असता तर खतांवरील खर्च वाचला असता, अशी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पंजाबराव डख यांच्या माफीनंतर आता त्यांच्या हवामान अंदाजांवर सोशल मीडियावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.