मोहोळमध्ये लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा, बिरोबा मंदिरात नेमकं काय घडलं?
Laxman Hake Mohol Clash : सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील बिरोबा मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या लक्ष्मण हाके यांचे समर्थकांचा राडा.
Laxman Hake Mohol Clash : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात (Hake) मराठा समर्थक आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. आडेगाव येथील बिरोबा मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या लक्ष्मण हाके यांना मराठा समर्थकांनी जाब विचारत त्यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला. तुम्ही इथे कशाला आलात, असा सवाल करत काही जणांनी थेट त्यांच्या दिशेने धाव घेतली. सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर परिस्थिती चिघळत हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकारानंतर लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी बोलताना घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवला. मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील बिरोबा यात्रेत सहभागी झाल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. यावेळी मंदिरातील पुजाऱ्यांच्या आग्रहाखातर आमचा सत्कार सुरू होता. दरम्यान, माईकवर बोलणाऱ्या व्यक्ती आणि समोर बसलेल्या काही लोकांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर काही जण अचानक आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून आले. तुम्ही इथे कशाला आलात, असा सवाल करत त्यांनी गोंधळ घातल्याचे हाके यांनी सांगितले.
या वादाचे रुपांतर पुढे धक्काबुक्की आणि हाणामारीत झाले. समोरच्या गटातील लोकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आमचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये झटापट झाली. देवदर्शनासाठी गेल्यानंतर मंदिरात अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत चुकीचे आहे. आम्ही कुठे फिरायचे नाही का, आमच्या उपस्थितीमुळे नेमकी कोणाची अडचण होते, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.
Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
काही लोक केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी पुढे आले होते. आपण केलेल्या कामाचा गाजावाजा करण्यासाठी आणि स्वतःला मोठे दाखवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला, असा आरोपही हाके यांनी केला. राज्यातील सामाजिक वातावरण हळूहळू सुरळीत होत असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मंदिरात आमचा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता किंवा भाषणही होणार नव्हते. आम्ही केवळ दर्शनासाठी गेलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे आमच्यासोबत पोलीस बंदोबस्त असतानाही मंदिराच्या गाभाऱ्यात अशा प्रकारे अंगावर धावून येणे धक्कादायक आहे. कोणतेही कारण नसताना देवाच्या दारात अशा पद्धतीने वागण्यामागची मानसिकता काय आहे, असा सवाल त्यांनी केला. दिवाळीनंतर राज्यातील गावागावांत विविध देवतांच्या यात्रा आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा ठिकाणी जात, धर्म किंवा पंथ असा कोणताही भेदभाव नसतो. देवाच्या दारी सर्वजण समान असताना मंदिरातच अशा प्रकारची वागणूक देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. अशा प्रकारच्या धमक्या आणि दबावाला आम्ही अजिबात घाबरणार नाही. उलट शोषित, वंचित, आदिवासी आणि ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला. धार्मिक स्थळी दर्शनासाठी जाण्यालाही विरोध केला जात असेल, तर सर्वसामान्यांनी नेमकी कोणती भूमिका घ्यायची, असा सवाल करत त्यांनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.