रत्नागिरी (खेड) : पाच मार्चला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा झाली होती. तेव्हा त्या सभेला उत्तर देण्याकरता म्हणून उत्तर सभा घेणार असे रामदास कदम यांनी जाहीर केले होते. या सभेचे वर्णन एका वाक्यात आणि एका शब्दात करायचं झालं तर परीक्षेला बसल्यानंतर जर परीक्षेचा पेपर फुटला आणि फुटलेला पेपर हा जर एखाद्या फुटीर गटाच्या हातामध्ये आला, तर त्यांनी तो पेपर फुटलेला असल्यामुळे कॉपी करून जर अधिक चांगले मार्क घेतले तर त्याचं खरं श्रेय किंवा तो खरा हुशार विद्यार्थी समजला जातो. मात्र, आजच्या सभेत रामदास कदमांना कॉपी करणे देखील जमले नाही. नुसतेच फडफड करत होते. म्हणजे उद्धव ठाकरे यांची सभा आधी होऊनही रामदास कदमला उत्तर देणे जमले नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने रामदास कदम हा माणूस अत्यंत ‘ढ’ कॅटेगरीतला आहे, अशी सडकून टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज सभा झाली. ही सभा म्हणजे उद्धव ठाकरे यांना उत्तर आहे, असे रामदास कदम यांनी आधीच जाहीर केले होते. आजच्या सभेनंतर रामदास कदम यांच्या भास्कर जाधव यांनी खरपूस समाचार घेतला.
भास्कर जाधव म्हणाले की, आमची मूळ सभा बघितल्यानंतर त्या सभेच्या तोडीस तोड सभा करावी असा यांनी प्रयत्न केला. पण फुटलेला पेपर सुद्धा यांना लिहिता आला नाही इतके हे ‘ढ’ विद्यार्थी आहेत. एवढंच आजच्या सभेचे विश्लेषण करता येईल. विजणारा दिवा जो असतो त्याला जास्त फडफड करावी लागते. रामदास कदम सातत्याने सहा महिन्यांपासून जे उद्धव ठाकरेंबद्दल बोलतात त्याच्यापेक्षा सभेमध्ये काही वेगळे विचार त्यांनी दिलेत का, त्यामुळे ‘बाप तसा बेटा जे बाप बोलतो तेच बेटा’ बोलणार यांची कुवत आणि मर्यादा तेवढीच असते. त्यामुळे त्यांच्याबद्दल फार अपेक्षा ठेवण्यात काहीही अर्थ नाही. निष्ठा आणि रामदास कदम यांची शिवसेनेशी प्रामाणिकपणा हे जगजाहीर आहे.
३२ वर्ष सातत्याने जो सत्तेच्या खुर्चीमध्ये पदावर बसला. तो पदावरून उतरल्याबद्दल ज्या भाषेमध्ये बोलतोय, हे कोकण पाहत आहे. कोकणातील जनता त्याची भाषा येणाऱ्या काळात त्याच्या तोंडात घालणार आहे, एवढं मी आता नक्की सांगू शकतो, असे भास्कर जाधव यावेळी म्हणाले.