Big dilemma over Bachchu Kadu’s candidacy : महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या पावश्वभूमीवर सध्या मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेकडून संभाव्य उमेदवार म्हणून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावं आघाडीवर असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या दोन्ही नावांना पक्षांतर्गत विरोध होत असल्याने समीकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. शिंदे गटातील काही मंत्री आणि नेत्यांनीच या नावांवर आक्षेप घेतल्याचे समोर येत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, असा सूर पक्षात उमटत आहे. विशेषतः बच्चू कडू यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बच्चू कडू यांचा शिवसेनेशी नेमका संबंध काय? असा थेट सवाल देखील काही नेत्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या उमेदवारीसंदर्भात शिवसेनेकडून एक महत्वाची अट घालण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवसेनेत विलीनीकरण करावे, असा प्रस्ताव कडू यांच्यासमोर ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. या अटीवरच त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्याचा विचार सुरू असल्याचे देखील कळते. 23 एप्रिल रोजी बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने या चर्चांना अधिक वेग आला आहे. 1999 साली स्थापन झालेल्या प्रहार जनशकतो पक्षाने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 38 जागा लढवल्या होत्या, मात्र एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता.
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांविना पद्म पुरस्कार समितीची घोषणा; जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली नवी रचना
सुमारे 1.55 टक्के म्हणजेच 3.07 लाख मतं पक्षाला मिळाली होती. याआधी शिंदे यांच्या बंडावेळी कडून यांनी त्यांना पाठिंबा दिला होता, मात्र 2024 नंतर त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू शिवसेनेची अट मान्य करून विधान परिषद निवडणुकीत उतरतात की नाही, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड मानले जात आहे. 10 पैकी 9 जागा महायुती सहज जिलकु शकते, तर महाविकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
9 जागांसाठी 29 मतांचा कोटा असणार आहे, तर एका जागेसाठी 51 टक्के मतांची अट लागू होणार आहे. विशेष म्हणजे, मतदान एकाच दिवशी होणार असले तरी आमदारांना दोन वेळा मतदान करावे लागणार आहे. लवकरच विधान परिषदेतील अनेक दिग्गज सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे. तसेच प्रज्ञा सातव यांच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक देखील होणार आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 23 एप्रिल 2026 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 2 मे रोजी छाननी, तर 4 मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 12 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी केली जाईल. 13 मे पर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या साऱ्या घडामोडींमुळे विधान परिषद निवडणूक अधिकच रंगतदार बनण्याची चिन्हे दिसत आहेत.
