आज एका झुरळाने हुकूमशाहीला झुकवलं; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात

शिवसेना उ. बा. ठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

  • Written By: Published:
Untitled Design   2026 07 25T170216.574

Uddhav Thackeray’s warning to the government : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर देशभरातील आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त होत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचे, त्यांचे नेतृत्व करणाऱ्या अभिजित दीपके यांचे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या पालकांचे कौतुक करत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, अभिजित दीपके आणि देशातील सर्व तरुणांचं आणि न घाबरता त्यांना पाठिंबा देणाऱ्या पालकांचं अभिनंदन. या तरुणांनी देशातील जनतेला भयाच्या छायेतून बाहेर काढलं आहे. या देशात लोक शिल्लक राहिलेलेच नाहीत जणू सगळी झुरळाच आहेत असं हे सरकार वागत होते. आज एका झुरळाने हुकूमशाहीला झुकवलेलं आहे. ज्यांनी या तरुणांना झुरळ म्हटलं होत त्यांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे. आपण खुर्चीवर बसलोय म्हणून डोक्यात मस्ती गेल्यासारखा वागू नये.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करतानाच उद्धव ठाकरे यांनी आंदोलन अद्याप संपलेले नसल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या आणखी दोन महत्त्वाच्या मागण्या सरकारसमोर प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप केले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याव्यतिरिक्त अजून 2 मागण्या पुढे ठेवल्या आहेत. या आंदोलनादरम्यान भाजप सरकारचा एक भीषण आणि भयावह चेहरा जगासमोर आला आहे. ज्याप्रकारे महिलांवर, युवतींवर हल्ला करण्यात आला. तरुणींच्या कपड्यांवर हात टाकण्यात आला. पोलिसांच्या आडून या आंदोलनात जे मारहाण करणारे गुंड घुसडले गेले होते. ज्यांच्या अंगावर कुठलाही युनिफॉर्म नव्हता. त्यांच्यावर कारवाई करणार कि नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

दिल्लीत मोठा राजकीय भूकंप, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अन् देवेंद्र फडणवीसांची दिल्लीवारी; पडद्यामागे काय शिजतंय?

याचबरोबर आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भातही त्यांनी केंद्र सरकारला थेट प्रश्न विचारला. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार आहेत कि नाही? हे अमित शहांनी सांगावं. नाही तर हि तरुणाई धर्मेंद्र प्रधानांकडून त्यांचा मोर्चा अमित शहांकडे वळवेल, असा इशारा त्यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करत म्हटले, मी पुन्हा एकदा या तरुणांना धन्यवाद देतो. अजूनही क्रांतिकारी तयार होऊ शकतात हे या तरुणाईने दाखवून दिल आहे. या आंदोलनाने देशातील तरुणाईची ताकद आणि अन्यायाविरोधात उभे राहण्याची क्षमता सिद्ध केली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, आधीच जाहीर करण्यात आलेला युवाशक्तीचा मोर्चा नियोजित कार्यक्रमानुसार होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. उद्याचा आमचा मार्च होणार असून युवाशक्तीची हि ताकद मोठ्या प्रमाणात आपण संपूर्ण देशाला दाखवून दिली पाहिजे. पहिले ठरवल्याप्रमाणे उद्याचा कार्यक्रम होणार आहे, असे ते म्हणाले. आंदोलनाचे प्रमुख चेहरे म्हणून समोर आलेल्या अभिजित दीपके यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नसल्याची माहितीही त्यांनी दिली. अभिजित दिपकेसोबत चर्चा करून मी पुढची दिशा ठरवणार आहे. सध्या तरी त्याच्याशी माझा कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही. मात्र जसा संपर्क होईल मी त्याच्याशी चर्चा करून या आंदोलनाची पुढील दिशा ठरवेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनाच्या पुढील टप्प्याकडे देशाचे लक्ष लागले असून विद्यार्थ्यांच्या उर्वरित मागण्यांवर केंद्र सरकार कोणती भूमिका घेते आणि आंदोलनाची पुढील दिशा काय ठरते, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

follow us