छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक संस्था मतदारसंघात (Election) भाजप सदस्यांची संख्या वाढलेली असल्याने या जागेसाठी पक्ष आग्रही होण्याबरोबरच इच्छुकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. ही जागा युतीमध्ये भाजपला सोडवून घ्यावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी केली आहे. या मतदारसंघात आता माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, माजी आमदार संजय केनेकर यांची नावं चर्चेत आहेत. ५८९ मतदारांपैकी २८० भाजपचे सदस्य आहेत.
महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये आता भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सर्वात सोपी असं चित्र राजकीय पटलावर दिसून येत आहे. गेल्या वेळी या मतदारसंघात अंबादास दानवे यांनी यश मिळवलं होतं. त्यांना विजयासाठी लागणारी काही मतं ‘एमआयएम’ कडून मिळवली, असा त्यांच्यावर आरोप होता. जालन्याचे बाबुराव कुलकर्णी यांना कॉग्रेसने उमेदवारी दिली होती. या निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी तेव्हा लढत होती. शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे गटाची ताकत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
ठाकरे गट या निवडणुकीमध्ये उतरणार नाही अशीच चर्चा सध्या सुरू आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकदही भाजपच्या संख्येपेक्षा अधिक नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुकांची यादी मोठी आहे. या मतदारसंघात उमेदवारी मिळावी असे प्रयत्न करण्यास सुरुवात झाली असून डॉ. भागवत कराड किंवा संजय केनेकर या दोन नेत्यांकडं हे पद दिलं जावं, अशी व्यूहरचना काही कार्यकर्ते आखत आहेत.
जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे हेही या पदासाठी इच्छूक असल्याचं सांगण्यात येत आहे. या मतदारसंघात जालना जिल्हा परिषदेची निवडणूक अद्यापही झालेली नाही. जालना जिल्ह्यात २१७ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३७२ असे मतदार असून यात वाढ होण्याची शक्यता आहे. स्वीकृत सदस्यांच्या नोंदी यात घेतल्या जाणार असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
दरम्यान या जागेसाठी जालन्यावरुन माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनीही दावा केला आहे. जालना महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि जालना शहरातही भाजपचे कमळ फुललं. या पूर्वी अनेकदा प्रयत्न करुनही जालना शहरात भाजपला यश मिळालं नव्हतं, गोरंट्याल यांच्यामुळं ते मिळालं. दरम्यान, आपण महापालिका निवडणुकीत यश मिळाल्याशिवाय काहीही मागणार नाही, असं म्हणालो होतो. आता स्थानिक स्वराज मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी करणार आहे.
तर दुसरीकडं आजही चर्चेत असलेल्या बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची 20218ची निवडणूक आठवते. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रतिष्ठेचा, सर्वात महागडा आणि कमालीच्या नाट्यमय घडामोडींसाठी ओळखला जाणारा हा मतदारसंघ आहे.
मे 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत झालेला पडद्यामागच्या खेळ मोठा रंजक ठरला होता. पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे अशी थेट लढत या मतदारसंघात पहायला मिळाली होती. दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या काळापासून भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा हा मतदारसंघ. 2018 मध्ये ही निवडणूक भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांचे भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती.
बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तिन्ही जिल्ह्यांतील जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि पंचायत समिती सभापती हे या निवडणुकीत मतदार होते. कागदावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे पारडे प्रचंड जड होते. तिन्ही जिल्ह्यांचे मिळून एकूण 1 हजार सहा मतदार होते. विजयासाठी 504 मतांचा कोटा ठरला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडे 527 मते होती. त्यांचा उमेदवार सहज निवडून येईल अशी परिस्थिती असताना ही बाजी पंकजा मुंडे यांनी आपल्या बाजूने फिरवली होती.
भारतीय जनता पार्टीकडे 321, शिवसेना 64 मते व अपक्ष व इतर मिळून 94 मते होती. भाजपाने रमेश कराड हे निवडणूक लढवण्यास इच्छूक असताना पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीतून आयात केलेल्या सुरेश धस यांना उमेदवारी दिली. यावर प्रचंड नाराज झालेल्या पंकजा मुंडे समर्थक रमेश कराड यांनी तडकाफडकी भाजप सोडली आणि ते धनंजय मुंडे यांच्या गोटात सामील झाले. राष्ट्रवादीनेही त्यांना लगेच अधिकृत उमेदवारी जाहीर केली.
कराडांनी माघार घेतल्याने खळबळ उडाली होती.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, अचानक नाट्यमयरित्या रमेश कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागं घेतला. कराडांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीसह धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला. ही माघार इतक्या ऐनवेळी घेतली गेली की, राष्ट्रवादीला सारवण्याची संधीच मिळू दिली गेली नाही. राष्ट्रवादीकडं स्वतःचा अधिकृत उमेदवारच उरला नाही आणि हा पक्ष अक्षरश: हतबल झाला. धनंजय मुंडे यांनी पक्षाच्या नेत्यांकडं भांडून रमेश कराड यांना उमेदवारी मिळवून दिली होती. पण त्यांनीच ऐनवेळी दगा दिला आणि धनंजय मुंडे तोंडघशी पडले.
मुंडे यांनी तातडीने हालचाल करत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा जाहीर केला आणि त्यांच्या पाठीशी आपली सगळी ताकद झोकून दिली. रमेश कराड यांच्या माघारीमुळं सतर्क झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मतदारांना सहलीवर पाठवत त्यांच्यावर पाळत ठेवली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मतदान पार पडले, पण निकाल कोर्ट कचेरीत अडकला. पण जेव्हा निवडणूकीचा निकाल लागला तेव्हा भाजपाच्या सुरेश धस यांनी चमत्कार घडवला होता.
सुरशे धस यांनी 526 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस-आघाडीच्या अशोक जगदाळे यांचा 452 मते घेऊनही पराभवच झाला. 74 मतांच्या फरकाने सुरेश धस यांनी या निवडणुकीत बाजी मारली होती. कागदावर केवळ 321मतं असलेल्या भाजपने थेट 526 मते मिळवली होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तब्बल शंभरहून अधिक मते फुटली होती.
रमेश कराड यांचे राष्ट्रवादीत जाणं आणि नंतर अर्ज मागे घेणं, हा पंकजा मुंडेंचाच ‘मास्टरप्लॅन’ होता, अशी राजकीय वर्तुळात तेव्हा चर्चा होती. पंकजा मुंडे यांच्या या खेळीने धनंजय मुंडेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा पराभव पहावा लागला होता. या निवडणुकीत एका-एका नगरसेवकाच्या मताला लाखो रुपयांचा भाव आल्याची आणि मते फुटू नयेत म्हणून कोट्यवधी रुपये खर्च झाल्याची चर्चा होती. दरम्यान, आता 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मंत्री पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात काही सख्य नाही. धनंजय मुंडे आणि पकंजा मुंडे हे बहिण भाऊ एकत्र आहेत त्यामुळे या बदललेल्या राजकीय समिकरणांमध्ये कुणाला संधी मिळते आणि कुणाचा बळी दिला जातो हे पाहणं महत्वाचं आहे.
यावेळची स्थिती काय?
धाराशिव, लातुर, बीड जिल्ह्यात 1 हजार 132 मतदार आहेत. मात्र, बीड जिल्हा परिषदेची निवडणूक न झाल्याने 1 हजार 51 मतदार असणार आहेत. धाराशिव व लातुर या 2 जिल्हा परिषदेतून 114 जिल्हा परिषद सदस्य व 18 पंचायत समिती सभापती असे 132 मतदार असणार आहेत. लातुर महानगरपालिका 70, बीड, धाराशिव व लातुर या 3 जिल्ह्यातील 30 नगर परिषद व नगर पंचायत मधुन 776 निवडून आलेले व 73 प्राधिकृत केलेले असे 849 मतदार असणार आहेत.
जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी धाराशिव यांनी तसा अहवाल पाठवला आहे. 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे.धाराशिव-लातूर-बीड यासह 16 मतदार संघाची निवडणुक जाहीर झाली असुन आदर्श आचारसंहिता लागु झाली आहे. सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली- सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर- जालना या 16 मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे.
