BJP Maharashtra Vice Presidents : भारतीय जनता पक्षाने (भाजप) महाराष्ट्रात संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल जाहीर केले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी मुंबईत प्रदेश कार्यलयात पत्रकार परिषद घेऊन 12 नव्या प्रदेश उपाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. या यादीत केशव उपाध्ये, गोपीचंद पडळकर, सुजय विखे पाटील, भारती पवार, अर्चना पाटील चाकूरकर यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. काही जुन्या पदाधिकाऱ्यांना बढती देत नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहे. पक्ष संघटनेला अधिक सक्षम आणि गतिमान करण्याचा प्रयत्न केला आहे.
नव्या नियुक्त्यांमुळे प्रदेश पातळीवरील समन्वय वाढेल आणि कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, पदांची संख्या मर्यादित असल्याने सर्वांना संधी देता येत नाही, पण जे राहिले त्यांना मोर्चा आणि आघाड्यांमधून कामाची संधी दिली जाईल.
संयमाचे फळ
सर्वात लक्ष वेधून घेणारी नियुक्ती म्हणजे धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांची भाजप (BJP) युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली . राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या कुटुंबातील हे तरुण नेते असून, नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाने दिलेल्या आदेशानंतर उमेदवारी मागे घेत संयम दाखवला होता. त्यानंतर पक्ष नेतृत्वाने त्यांच्या या संयमाचे फळ म्हणून युवा मोर्च्याचे नेतृत्व सोपवले असल्याचे बोलले जात आहे.
युवा मोर्चा जबाबदारी
युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यभरातील तरुण कार्यकर्त्यांना एकत्रित करणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि आगामी काही जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच इतर स्थानिक निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका बजावणे ही कृष्णराज महाडिक (Krishnaraj Mahadik) यांच्यावर प्रमुख जबाबदारी असणार आहे. युवा मोर्च्याची भूमिका या निवडणुकांमध्ये महत्त्वाची ठरणार असल्याने त्यांच्या नियुक्तीकडे पक्षांतर्गत आणि विरोधकांकडूनही लक्ष असणार आहे.
संयमाचे गिफ्ट
संयमचा विचार करता आतापर्यंत पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळणारे केशव उपाध्ये यांची प्रदेश उपाध्यक्षपदी बढती करण्यात आली आहे. उपाध्ये हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे प्रभावी प्रवक्ते म्हणून ओळखले जातात. माध्यमांशी सातत्याने संवाद साधत विरोधकांच्या टीकेला ठामपणे उत्तर देणे, पक्षाची भूमिका स्पष्ट आणि आक्रमकपणे मांडण्याची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर आता अधिक मोठी संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. प्रदेश उपाध्यक्ष म्हणून उपाध्ये यांच्याकडे आता संघटन विस्तार, कार्यकर्त्यांशी समन्वय आणि निवडणूकपूर्व तयारी यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतील.
पश्चिम महाराष्ट्रातील बहुजन प्रतिनिधित्व
भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी गोपीचंद पडळकर यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. ते 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जत मतदारसंघातून विजयी झालेले आमदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीपासून सुरू होऊन 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून पूर्ण झाला. 2020 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून आले होते, पण विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी आमदारकीची शपथ घेतली.
अजितदादांच्या शोकसभेला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; पहा फोटो
पडळकर हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावी नेते मानले जातात आणि बहुजन समाजातील त्यांचे चांगले नेटवर्क आहे. पक्षाने त्यांच्या नियुक्तीतून पश्चिम महाराष्ट्रातील संघटन विस्तार आणि बहुजन प्रतिनिधित्वाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.पश्चिम महाराष्ट्रातील संघटन विस्तार, जिल्हा-तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांशी समन्वय आणि पक्षाच्या ग्राउंड लेव्हल कामकाजाला गती देण्याची प्रमुख जबाबदारी असेल.
