Ashish Shelar And Chandrashekhar Bawankule Both Want Posts : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ स्थापनेस बराच विलंब झाल्याचं पाहायला मिळालं. अगदी तिकीट वाटपासून ते मंत्रिपदापर्यंत महायुतीत लॉबिंग झाल्याचं चित्र आहे. त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) या दोघांनाही मंत्रिपद मिळालेलं आहे. तरी देखील ते आपापलं अध्यक्षपद सोडण्यास तयार नसल्याचं दिसतंय.
तर माजी मंत्री रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्षपदाच्या स्पर्धेत असल्याची माहिती मिळतेय. त्यांच्याकडे देश संघटनपर्व समितीच्या प्रदेश प्रभारीपद सोपवण्यात आलंय. भाजपात अंतर्गत मतभेद सुरू (Maharashtra Politics) आहेत. हे सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे जाणार असल्याचं समोर येतंय. 12 जानेवारी रोजी शिर्डीत भाजपचं प्रदेश अधिवेशन पार पडणार आहे. जर त्यांचं मतभेद मिटले, तर या अधिवेशनामध्ये नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
Year Ender 2024 : देश-विदेशातील ‘या’ 8 घटना, ज्या विसरणे अशक्यच; वाचा सविस्तर..
माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती करण्याची इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. कारण चव्हाण यांच्याकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोकणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पडली. या दोन्ही निवडणुकांत भाजपला कोकणात चांगला विजय मिळालेला आहे. तरीही चव्हाण यांना मंत्रिपद दिलं नसल्यामुळे त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याचं दिसतंय.
महाराष्ट्रात दोस्ती, दिल्लीत कुस्ती, राष्ट्रवादी स्वबळावर लढणार; उमेदवारांची घोषणा
मिळालेल्या माहितीनुसार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी राहायचं आहे. त्यांना स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत देखील चांगली कामगिरी करायची आहे. तर दुसरीकडे मंत्री आशिष शेलाकर यांना देखील मुंबई अध्यक्षपदावर कायम राहायचं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या पदाचा भार सुनील राणे यांच्याकडे सोपवायचा आहे. आमदार प्रवीण दरेकर देखील या पदासाठी लॉबिंग करत असल्याचं समोर आलंय.
माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रदेश संघटनपर्व समितीच्या प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती झालीय. तर माजी आमदार अनिल सोले यांची प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालीय. या समितीमध्ये छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, मुंबईचे माजी आमदार अतुल शाह आणि पुणे येथील योगेश गोगावले सदस्य आहेत.