बीड : बीडमधील परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांची निवड झाली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गटाचे चंद्रकात कराड यांची उपाध्यक्षपदी निवडणूक झाली आहे. 1 जून रोजी संचालक मंडळाची बिनविरोध निवडणूक पार पडल्यानंतर आज (19 जून) अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. (BJP leader Pankja Munde has been elected as the president of Vaidyanath Cooperative Sugar Factory in Parli)
यापूर्वी जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीतही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती. यातून दोन्ही नेते बिनविरोध निवडून गेले होते. दरम्यान, या दोन्ही निवडणुकांमुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे भाऊ-बहिण असले तरीही त्यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राने अनेकदा पाहिला आहे. हे दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे जवळपास प्रत्येक निवडणुकीत दिसून आले. मात्र, बीडमधील परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुंडे बहिण-भाऊ एकत्र आले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. ऊस उत्पादकांच्या हितासाठी 21 संचालकांची बिनविरोध निवड केली, निकालानंतर मुंडे बंधू-भगिनींनी सांगितले होते.
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर पंकजा मुंडे यांचे वर्चस्व आहे. धनंजय मुंडे त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देत होते. पण, सहकारात राजकारण नको, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे आवश्यक आहे; असा राजकीय तडजोडीचा पवित्रा घेऊन पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी संघर्ष टाळला. या निवडणुकीसाठी पंकजा गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे हे भाऊ-बहीण एकत्र आले. त्यामुळे 21 सदस्यांचे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले.
बिनविरोध निवडून 21 उमेदवार –
पंकजा मुंडे, यशश्री मुंडे, केशवराव माळी, वाल्मिक कराड, श्रीहरी मुंडे, रेशम कावळे, ज्ञानोबा मुंडे, राजेश गीते, सतीश मुंडे, अजय मुंडे, पांडुरंग फड, हरिभाऊ गुट्टे, सचिन दरक, सुरेश माने, वसंत राठोड, चंद्रकेतू करडा, शिवाजीराव गुट्टे, शिवाजी मोरे , सुधाकर सिंगारे , सत्यभामा उत्तमराव आघाव , मंचक घोबाळे.