Suresh Dhas on Dhananjay Munde : मी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. ती मागणी त्यांच्याच पक्षातील लोक करत आहेत. परंतु, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड काही वेगळे नाहीत. (Dhananjay Munde ) त्या एकाच नान्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे त्यांनी ही गिधाडं पोसल्यामुळचं आमचा संतोष देशमुख गेला असा घणाघाती आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मु्ंडे यांच्यावर केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. तसंच, धनंजय मुंडेंबद्दल अनेक फाईली माझ्याकडे आहे त्या एकदोन दिवसांत काढणार असल्याचाही बॉम्ब धस यांनी यावेळी फोडला.
अंजली दमानिया किंवा करुणा शर्मा काय म्हणाल्या यापेक्षा धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदावरुन दूर व्हावे, अशी मागणी त्यांच्याच पक्षातील आमदार करत आहेत. अनेक संघटनांचीही तीच मागणी आहे. मी अद्याप धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. पोलिसांकडून संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सुरु आहे. एसआयटी आता आकापर्यंत पोहोचली आहे. कारवाई त्यापुढे गेल्यावर मी त्याबाबत बोलेन. याप्रकरणात धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल, असंही आमदार धस म्हणाले आहेत.
आकाच्या गँगचा माज उतरला नाही, आकाच्या आकाची नार्को करा, सुरेश धस संतापले
संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप मारेकरी कृष्णा आंधळे फरार आहे. याबाबत सुरेश धस यांनी म्हटले की, संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून योग्य पद्धतीने सुरु आहे. फक्त कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या कामगिरीवरील कलंक आहे. कृष्णा आंधळे हा छत्रपती संभाजीनगरला पोलीस भरतीची तयारी करत होता. मात्र, तो गुन्हेगारीकडे वळला. तो सायको झाला होता. त्याला आई-वडील किंवा कुटुंबाशी देणंघेणं नव्हतं. तो अनेक गुन्ह्यात फरार होता. आतादेखील तो राज्याबाहेर लपून बसला असेल असंही ते म्हणाले.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही, याचा निर्णय अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या हातातआहे. त्यांनी मनात आणलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा होऊ शकतो. या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचंड बदनामी होत आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख प्रकरणात सर्व गोष्टी केल्या आहेत. त्यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये दिले, एसआयटी स्थापन केली आणि आरोपींना मकोका लावला, असे सांगत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू अजितदादांच्या कोर्टात ढकलला.