Download App

राज ठाकरेंसाठी आमचे दारे खुलेच आहे…Chandrashekhar Bawankule यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

  • Written By: Last Updated:

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भारतीय जनता पार्टी (BJP) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जवळीक वाढली आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राज ठाकरे यांच्याबाबत एक वक्तव्य केले आहे, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे यांचा मोदींवर विश्वास असून त्यांच्यासाठी आमचे दार खुलेच आहे असे बावनकुळे म्हणाले आहे. आगामी निवडणुका पाहता बावनकुळेंच्या या वक्तव्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिकमध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या समारोपानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहेच, त्यांचा भाजपवर आणखी विश्वास वाढेल.

राज ठाकरे यांच्यासाठी आमचे दार खुलेच आहे, असे सूचक वक्तव्य बावनकुळे यांनी केले. तसेच ते म्हणाले, भाजपमध्ये गद्दारांना नव्हे तर, इमानदारांना थारा आहे. राज ठाकरे हे प्रगल्भ नेते असून खुलेपणाने बोलतात. मनात एक आणि ओठावर एक असे त्यांचे नसते, अशा शब्दात बावनकुळे यांनी राज यांचे कौतुकही केले.

तसेच या बैठकीतून मिळालेल्या ऊर्जेचा उपयोग बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर ताकद उभी करण्यात होईल, असे बावनकुळे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयातून २०० हून अधिक जागा जिंकू असा दावा त्यांनी केला.

अमरावतीत झालेल्या पराभवाचे चिंतन करण्याची गरज आहे. समाज माध्यमांचा गैरवापर केला जात आहे. काही लोकांनी पेड वॉररूम तयार केल्या आहेत. त्याला उत्तर देण्यासाठी १८ हजार कार्यकर्त्यांची फौज उभी करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Tags

follow us