Bloody clash between Congress-MIM workers : अकोट फैल परिसरात रविवारी रात्री राजकीय वादाने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले. काँग्रेस आणि एएमआयएम या दोन पक्षांच्या नगरसेवकांमध्ये झालेल्या शःब्दिक वादाचे रूपांतर थेट हाणामारी, दगडफेक आणि चाकूहल्ल्यात झाले. या घटनेत एका व्यक्तीवर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला असून तो गंभीर जखमी झाला आहे. याशिवाय आणखी चार जण जखमी झाले असून सर्वांवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार एमआयएमचे नगरसेवक सय्यद रहीम हाशम आणि काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल करीम यांच्यात किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच चिघळला. दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी एकमेकांवर हल्ला चढवत परिसरात तणावाचे वातावरण निर्माण केले. या गोंधळादरम्यान एका व्यक्तीवर चाकूने वार करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात, अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर सुरू असलेली अंतर्गत राजकीय धुसफूस हेच या वादामागील प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये सतत तणावाचे वातावरण असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.
दरम्यान, यापूर्वी देखील अकोला महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ उडाला होता. शहरातील स्वच्छता कंत्राट, पडीक वॉर्डाचा निधी आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले होते. विशेषतः भाजप नगरसेवकांनी प्रशासनाऐवजी उत्तर देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्षेप घेतल्याने वातावरण तापले होते.
अकोला महानगरपालिकेतील सध्याचे पक्षीय बालंबाल असे आहे, एकूण 80 जागांपैकी बहुमताचा आकडा 41 आहे. भाजप 38 जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे, तर काँग्रेसकडे 21 जागा आहेत. उर्वरित जागांमध्ये विविध पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे. या घटनेमुळे अकोल्यातील राजकारण पुन्हा एकदा तबल्याचे चित्र दिसत असून पुढील काही दिवस परिस्थिती कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
