Bombay High Court On Bollywood Actors Over Firecracker Pollution Campaign: सणासुदीच्या काळात फटाक्यांमुळे होणारं वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करण्याच्या मुद्द्यावरुन मुंबई हायकोर्टाने बॉलिवूड कलाकारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या फटाके प्रतिबंधक मोहिमेत सहभागी होण्यासाठी बॉलिवूडमधील मोठे कलाकार विना मोबदला तयार नसल्याची माहिती समोर आल्यानंतर, अशा कामांसाठी सरकारी तिजोरीतून पैसे खर्च करण्याची गरज काय, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. सामाजिक उपक्रमांसाठी कलाकारांना सहभागी करून घेण्याकरता जनतेचा पैसा खर्च करू नका, असं स्पष्ट मतही न्यायालयाने मांडलं.
तुमची गँगस्टरने हत्या केली, तर कुटुंबाला विम्याचे पैसे मिळतील का?; आयोगाचा निकाल अन् नियम काय?
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सोमवारी (26 ऑक्टोबर) या प्रकरणाची सुनावणी झाली. राज्य सरकारने जनजागृती मोहिमेसाठी अनेक प्रसिद्ध कलाकारांशी संपर्क साधला होता. मात्र, प्रत्येक कलाकाराचे ठरलेले मानधन असल्याने कोणीही मोफत काम करण्यास तयार नसल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी न्यायालयाला दिली.
‘शहराकडून खूप काही मिळवलं, आता परत देण्याची वेळ’
कलाकारांच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी महत्त्वाची टिप्पणी केली. सामाजिक कामासाठी कलाकार विनामोबदला पुढे येत नसतील, तर त्यांच्याकडे जाण्याची गरजच काय, असा सवाल त्यांनी केला. मुंबईत राहून या शहराकडून अनेक गोष्टी मिळवणाऱ्या कलाकारांनी शहरासाठीही काहीतरी करण्याची तयारी दाखवायला हवी, “मानधन घेणाऱ्या कोणत्याही सेलिब्रिटीकडे जाऊ नका! कलाकारांना स्वतःच्या शहराबद्दल आस्था नसेल आणि त्यांना केवळ पैसे घेऊनच यायचं असेल, तर हे दुर्दैवी आहे. शहराबद्दल आपलेपणाची भावना असलेले आणि सामाजिक कामाची आवड असलेले कलाकार पुढे येतील आणि शहरासाठी काहीतरी योगदान देतील, अशी आमची अपेक्षा होती,” असं न्यायालयाने म्हटलं.
कर्जतच्या टोरंट प्रकल्पावरून संघर्ष पेटला; फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
कलाकारांना पर्यावरणाची आणि शहराची खरोखर काळजी असेल, तर त्यांनी स्वतःहून अशा मोहिमेत सहभागी व्हावं. त्यासाठी सरकारी निधी खर्च करण्याची आवश्यकता नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. ‘उमंग’ या मुंबई पोलिसांच्या वार्षिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बॉलिवूड कलाकार वेळ काढतात, मग पर्यावरणासारख्या महत्त्वाच्या सामाजिक विषयासाठी 15 मिनिटं का देऊ शकत नाहीत, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला.
बॉलिवूड नाही, तर मराठी कलाकारांना संधी द्या!
बॉलिवूडमधील कलाकार विनामोबदला सहभागी होणार नसतील, तर सरकारने मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांशी संपर्क साधावा, अशी सूचनाही हायकोर्टाने केली. मात्र, या जनजागृती मोहिमेसाठी कलाकारांनी कोणतंही मानधन न घेता काम करावं, अशी भूमिका न्यायालयाने मांडली.
फटाके फोडण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे प्रसिद्ध चेहऱ्यांवर सरकारी पैसा खर्च करण्यापेक्षा समाजातील लोकांना सहभागी करून घेण्यावर भर द्यायला हवा, असा या निरीक्षणांचा सूर होता.
शाळांमध्ये नियमित जनजागृती करा; झोपडपट्टी भागांकडेही लक्ष द्या
मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फटाके न फोडण्याची शपथ देण्याच्या उपक्रमाची हायकोर्टाने दखल घेतली. मुलांना पर्यावरण आणि प्रदूषणाच्या धोक्यांची जाणीव होत असल्याने अशा उपक्रमांचं सातत्य राखणं आवश्यक असल्याचं न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांनी नमूद केलं.
शाळांमधील जनजागृती केवळ एखाद्या दिवसापुरती मर्यादित न ठेवता दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसांतून एकदा व्याख्यानं आणि इतर उपक्रम आयोजित करावेत, अशी सूचना न्यायालयाने केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयीची जाणीव अधिक दृढ होऊ शकते, असं न्यायालयाने सूचित केलं.
याशिवाय, झोपडपट्टी भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत फटाके फोडले जात असल्याच्या मुद्द्यावरही न्यायालयाने चिंता व्यक्त केली. अशा परिसरांमध्ये संबंधित यंत्रणांनी विशेष लक्ष देऊन आवश्यक ती पावलं उचलावीत, असे निर्देश देण्यात आले.
25 नोव्हेंबरला पुन्हा सुनावणी
फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात मुंबई हायकोर्टाने स्वतःहून सुमोटो (Suo Motu) दाखल करून घेतलेल्या याचिकेवरील सुनावणी आता 25 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तोपर्यंत राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला जनजागृतीसाठी केलेल्या उपाययोजनांचा प्रगती अहवाल सादर करावा लागणार आहे.
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्स; बंटी पाटलांनी महायुतीसमोर पदर का पसरविला ?
फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी केवळ सरकारी मोहिमांवर अवलंबून न राहता कलाकार, शाळा आणि नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असा संदेश न्यायालयाच्या निरीक्षणांतून समोर आला आहे.
