6 वर्षांनी दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; हायकोर्टाच्या आदेशानंतर CBI तपास, नेमकं काय घडलं होतं?

दिशाच्या मृत्यूला अवघे 6 दिवस झाले असतानाच 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत याचाही मृत्यू झाला.

News Photo   2026 09 08T174422.469

6 वर्षांनी दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; हायकोर्टाच्या आदेशानंतर CBI तपास, नेमकं काय घडलं होतं?

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Disha Salian) याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. तब्बल 6 वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे या प्रकरणाच्या तपासाची दिशा बदलली असून CBI कडून चौकशी केली जाणार आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय झाल्याची माहिती आहे. त्यामुळे दिशाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, यासह यापूर्वीच्या तपासात उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरं आता CBI तपासातून शोधली जाणार आहेत.

8 जून 2020 रोजी मालाड येथील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता. त्या रात्री ती मित्रांसोबत फ्लॅटमध्ये असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली होती. सुरुवातीच्या तपासात हा आत्महत्येचा प्रकार असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. मात्र, दिशाच्या कुटुंबीयांनी हा निष्कर्ष मान्य केला नाही. तिच्या मृत्यूमागे काही वेगळं कारण असण्याचा संशय व्यक्त करत सतीश सालियन यांनी तपासावर प्रश्न उपस्थित केले आणि प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी न्यायालयात केली.

दिशाच्या मृत्यूला अवघे 6 दिवस झाले असतानाच 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत याचाही मृत्यू झाला. दिशाने काही काळ सुशांतची मॅनेजर म्हणून काम केल्याने दोन्ही घटनांमध्ये संबंध असल्याचे दावे आणि चर्चा त्यानंतर सुरू झाल्या. दरम्यान, पोलिसांच्या आधीच्या तपासात कोणतंही षडयंत्र किंवा लैंगिक शोषण झाल्याचे पुरावे आढळले नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, दिशाचे वडील या तपासावर समाधानी नसून काही प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती.

आता CBI तपासात या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रं आणि उपलब्ध नोंदी तपासल्या जाणार आहेत. दिशाच्या वडिलांची साक्ष नोंदवण्यासह घटनाक्रम, यापूर्वीचा तपास आणि उपलब्ध पुरावे यांची नव्याने छाननी होण्याची शक्यता आहे. पुरावे मिळाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, मात्र पुराव्याशिवाय कोणालाही आरोपी बनवू नये, अशी न्यायालयाची भूमिका असल्याचे वकिलांकडून सांगण्यात आले. त्यामुळे 6 वर्षांपासून चर्चेत असलेल्या दिशा सालियन प्रकरणाचा तपास आता कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version