मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये तेजी, ऑक्टोबरमध्ये मालमत्ता नोंदणीत 9 टक्क्यांची वाढ

मुंबईमध्ये घरखरेदीत ऑक्टोबर महिन्यात मालमत्ता नोंदणीमध्ये वार्षिक आधारावर तब्बल 9 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

Untitled Design   2026 11 02T130039.733

Untitled Design 2026 11 02T130039.733

Boom in Mumbai’s real estate market : मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील रिअल इस्टेट क्षेत्रासाठी ऑक्टोबर महिना उत्साहवर्धक ठरला आहे. मुंबईत घरखरेदीचा कल कायम असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं असून, ऑक्टोबर महिन्यात मालमत्ता नोंदणीमध्ये वार्षिक आधारावर तब्बल 9 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित सल्लागार संस्था नाईट फ्रॅंकने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात मुंबई महापालिका क्षेत्रात 12 हजार 690 मालमत्तांची नोंदणी झाली. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हाच आकडा 11 हजार 689 इतका होता. म्हणजेच यंदा मालमत्ता नोंदणीत लक्षणीय वाढ झाली आहे.

महाराष्ट्राच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीचं विश्लेषण नाईट फ्रॅंकने केलं आहे. या आकडेवारीमध्ये मुंबई महापालिका क्षेत्रातील प्राथमिक आणि दुय्यम अशा दोन्ही मालमत्ता बाजारपेठांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नोंदणी झालेल्या मालमत्तांमध्ये निवासी घरांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मुंबईत घरखरेदीसाठी ग्राहकांचा कल कायम असल्याचं स्पष्ट होत आहे.

मालमत्ता नोंदणीसोबतच राज्य सरकारच्या मुद्रांक शुल्काच्या महसुलात देखील वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात मुद्रांक शुल्कातून तब्बल 1 हजार 173 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 12 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. म्हणजेच मालमत्ता नोंदणीची संख्या वाढण्याबरोबरच सरकारच्या महसुलात देखील चांगली भर पडली आहे.

19 जणांचे बळी घेणाऱ्या विषारी दारूकांडानंतर कारवाई, मंत्री नरहरी झिरवाळांकडून एफडीएच्या कारवाईला स्थगिती

नाईट फ्रॅंक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी मुंबईच्या निवासी मालमत्ता बाजारपेठेतील या कामगिरीचं कौतुक केलं आहे. मुंबईतील घरबाजारपेठ सातत्याने आपली ताकद आणि स्थिरता दाखवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे, श्राद्धाचा कालावधी आणि नवरात्रीमध्ये नोंदणीसाठी उपलब्ध झालेला तुलनेने कमी कालावधी असून देखील ऑक्टोबरमध्ये ही वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे घरखरेदीदारांचा विश्वास आणि प्रत्यक्ष घर घेणाऱ्या ग्राहकांची मागणी मजबूत झाल्याचं बैजल यांनी स्पष्ट केलं.

दुसरीकडे, प्रॉपटेक क्षेत्रातील कंपनी रिलॉयचे संस्थापक अखिल सराफ यांनीही मुंबईतील घरांच्या विक्रीचा वेग कायम असल्याचं सांगितलं आहे. विशेषतः प्रीमियम, लक्झरी आणि अल्ट्रा लक्झरी घरांना ग्राहकांकडून चांगली मागणी मिळत आहे. जागतिक पातळीवरील अनिश्चितता कायम असतानाही मुंबईत प्रत्यक्ष घर खरेदी करणारे ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांकडूनही मागणी टिकून असल्याचं त्यांनी नमूद केलं.

एकूणच, मुंबईतील मालमत्ता नोंदणीत झालेली 9 टक्क्यांची वाढ आणि मुद्रांक शुल्क महसुलातील 12 टक्क्यांची वाढ ही मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारपेठेतील सकारात्मक स्थिती दर्शवणारी आहे. श्राद्ध आणि नवरात्रीसारख्या कालावधीचा परिणाम असूनही घरखरेदीचा उत्साह कायम असल्याने मुंबईच्या घरबाजारपेठेतील विश्वास आणि मागणी मजबूत असल्याचं या आकडेवारीतून अधोरेखित होत आहे.

Exit mobile version