मुंबई जगातील तिसरे सर्वाधिक प्रदूषित शहर! IQAir च्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
आठवडाभरात मुंबई पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर आल्याने प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले आहे.
Mumbai is the third most polluted city in the world : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील वायुप्रदूषणची पातळी दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. IQAir च्या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. अवघ्या आठवडाभरात मुंबई पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर आल्याने प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 166 वर पोहोचला असून, जगातील 122 शहराच्या यादीत मुंबईचा समावेश करण्यात आला आहे.
वाढते तापमान, मंदावलेले वारे आणि हवेतील आर्द्रता यांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळेही प्रदूषणाची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शहरातील धूर आणि धुरक्याचे प्रमाण वाढल्याने दृश्यमानतेवर परिणाम होत असून, मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जरांगेंवर टेंडर्सवरून आरोप करणारे बारस्करच अडचणीत; मालमत्ता खरेदीत गैरव्यवहारांचा आरोप
दरम्यान, मुंबईतील प्रदूषणाची पातळी दिल्लीपेक्षाही वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढले. परिस्थिती आणीबाणीची असताना प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना शांत झोप कशी लागू शकते, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
सण-उत्सवांच्या काळात होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल मुंबई महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस प्रशासनाला न्यायालयाने धारेवर धरले. सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यासह ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी आणि सण-उत्सवांच्या काळात फटाक्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा अत्यंत संथ गतीने काम करत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! 21 पैकी 9 जागा बिनविरोध, उर्वरित 12 जागांसाठी तिरंगी लढत
कर्तव्यपालनात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत. तसेच, मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आयुक्तांना 26 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी आतापर्यंत कोणती पावले उचलण्यात आली, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
अधिकारीही आम्ही ज्या हवेत श्वास घेतो, त्याच हवेत श्वास घेत आहेत की त्यांच्यासाठी वेगळी हवा आहे, ज्याची त्यांना जाणीवच नाही? अशी बोचरी टिप्पणी न्यायालयाने केली. तसेच, मुंबईकरांना घराबाहेर पडण्यापूर्वी हवेचा गुणवत्ता निर्देशांक तपासावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. एकीकडे मुंबई जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत वरच्या क्रमांकावर पोहोचत असताना, दुसरीकडे प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर प्रशासन कोणती ठोस पावले उचलते आणि मुंबईकरांना प्रदूषणाच्या विळख्यातून दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.