Maharashtra Budget : राज्यात मागच्या चार दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. कोसळणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून, याच मुद्द्यावरून विरोधकांनी विधानभवनात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांना विविध मुद्दे उपस्थित केले आहेत.
आज याच मुद्द्यावरून राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, ‘ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर हे राज्य चालतं लाखोंचा पोशिंदा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळीमुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे यामुळे परिस्थिती अतिशय भीषण बनली आहे. कृषी मंत्र्यांच्या मतदार संघातदेखील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ज्यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे त्यांच्या काय कुठेच अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडू नये.’
हेही वाचा : स्थगिती सरकारचा धिक्कार असो, नुकसानभरपाई जाहीर करा; अजित पवार, अंबादास दानवेंचा हल्लाबोल
मात्र, दुर्देवाने अशा घटना घटत आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, परिस्थित लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून एक निवेदन करून तातडीच्या मदतीची घोषणा करतील असं वाटलं होतं. अशाप्रकारे तातडीची मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज होती.
मदत तर, सोडाच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांनो काळजी करू नका हे सरकार तुमच्या पाठीशी आहे. मात्र अशाप्रकारे साधा धीर देण्याचं कामही झालेलं नाही. राज्यातील शेतकरी चिंतातूर झाला असून, परिस्थिती भीषण आहे. ज्याप्रमाणे आज अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे ज्या मुलभूत गोष्टी आहेत त्यावर निर्णय घेणेदेखील आवश्यक असल्याचे म्हणत शेतकऱ्यांच्या बाबतीत सुरू असलेल्या राज्य सरकारच्या कामकाजाबाबत अजित पवारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.