Download App

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदारांनी पेटवली चूल; गॅसदरवाढीचा केला निषेध

मुंबई : ‘या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… खावटी अनुदान न देणार्‍या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.. खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले.. बजेटमध्ये भोपळा देणार्‍या सरकारचा धिक्कार असो.. महागाई वाढवणार्‍या सरकारचा धिक्कार असो..’ अशा घोषणांनी आज विधिमंडळाचा परिसर दणाणला. वाढती महागाई (Inflation) आणि गॅस दरवाढीच्या (LPG Price Hike) निषेधार्थ आज विरोधकांनी पुन्हा विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. सरकारच्या कारभाराचा निषेध करत जोरदार घोषणा दिल्या.

वाचा : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे गाजर आंदोलन

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सध्या सुरू आहे. अधिवेशनाचा आजचा बारावा दिवस आहे. आज विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर चूल रचत त्यावर प्रतिकात्मक गॅस सिलिंडर ठेऊन गॅस दरवाढीचा निषेध केला.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच महागाईच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक आहेत. कांदा व  कापसाच्या भावाच्या प्रश्नांवरही आमदारांनी आधी आंदोलन केले होते. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच कांदा दराच्या प्रश्नावरून सत्ताधारी विरोधकांत जोरदार रणकंदन झाले होते. त्यानंतर अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. यावरही विरोधकांनी आवाज उठवत सरकारला धारेवर धरले.

विधानभवनाच्या पायर्‍यांवर राडा, विरोधकांचं कांद्याच्या माळा घालून आंदोलन

याच काळात गॅसच्या किंमती वाढविण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला. त्यामुळे विरोधक अधिकच संतप्त झाले. सरकारी पातळीवर सुरू असलेल्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी आज पुन्हा एकदा विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. सरकारच्या कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध केला. जोरदार घोषणा देत निदर्शने केली.

Tags

follow us