Case of outraging modesty registered against Sujay Phadke : सोलापूरमधील दिवंगत मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या कुटुंबातील संपत्तीचा वाद आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. डॉ वळसंगकर यांचे जावई सुजय फडके यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा रंगली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी 2026 ते जून 2026 या कालावधीत सुजय फडके यांनी संपत्तीच्या वादातून सातत्याने त्रास दिला.
घरात येण्या-जाण्यास मज्जाव करणे, तिच्या परवानगीशिवाय घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, तसेच वीज आणि पाणीपुरवठा बंद करून मानसिक छळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारातून विनयभंग झाल्याचा आरोप देखील पीडितेने केला आहे. तक्रारीच्या आधारे सोलापूरमधील सदर बाजार पोलीस ठाण्यात सुजय फडके यांच्या विरोधात विनयभंगासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईक मिळणारच; पक्षफोडीवर राज ठाकरेंचा घणाघात
आत्महत्येनंतर सुरू झाला संपत्तीचा वाद
18 एप्रिल 2025 रोजी सोलापूरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या निधनानंतर कुटुंबातील संपत्तीच्या वाटपावरून वाद निर्माण झाला. विशेषतः सुजय फडके आणि त्यांच्या नात्यातील एका महिलेमध्ये हा वाद तीव्र झाला होता. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात तक्रारी आणि चौकशी सुरू होती. आता या वादाने गुन्हेगारी स्वरूप धारण केल्याचे चित्र आहे.
कोण होते डॉ. शिरीष वळसंगकर?
डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर हे सोलापुरातील नामांकित मेंदूरोगतज्ज्ञ (न्युरोफिजिशियन) होते. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेले एस. पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेस हे कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक न्युरो हॉस्पिटल म्हणून ओळखले जात होते. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर येथून त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर डॉ. व्ही. एम. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि एमडी पूर्ण केले. पुढे लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून त्यांनी एमआरसीपी (यूके) ही पदवी संपादन केली. तसेच लंडनमधील मैदा वेल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल येथे त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले होते.
सलग सात वेळा दरवाढीनंतर अखेर दिलासा; व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट
देश-विदेशात त्यांनी मेंदूविकारांवरील उपचार आणि संशोधन विषयक अनेक शोधनिबंध सादर केले. 1999 पासून त्यांनी आधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णालयातून रुग्णसेवा सुरू केली होती. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबरोबरच त्यांना विमान उड्डाणाचीही विशेष आवड होती. भारतभर प्रवासासाठी त्यांनी स्वतःचे विमान खरेदी केले होते आणि अनेक प्रशिक्षणार्थी वैमानिकांनाही त्यांनी मार्गदर्शन केले होते.
दरम्यान, संपत्तीच्या वादातून दाखल झालेल्या या गुन्ह्यामुळे डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहेत.
