बुधवार पेठेतील महिलेच्या चित्रीकरण प्रकरणात मोठा ट्विस्ट; रोहन कदमला वगळून इतर पत्रकारांना गोवण्याचा प्रयत्न?

इतर काही पत्रकारांना देखील जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

Untitled Design 71

Untitled Design 71

case was registered against journalist : पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली एका महिलेचे चित्रीकरण केल्याप्रकरणी उघडकीस आलेल्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पत्रकार रोहन कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी या घटनेचा विस्तार आता अधिक व्यापक होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात इतर काही पत्रकारांना देखील जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

महिलेच्या तक्रारीनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरूवात केली, तपासादरम्यान संबंधित लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज महत्वाचा पुरावा ठरत आहे. या फुटेजची बारकाईने तपासणी केल्यानंतर रोहन कदम वगळता इतर कोणतेही पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित असल्याचे आढळून आले नाही, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे इतर पत्रकारांचा या घटनेशी थेट संबंध असल्याबाबत सध्या तरी कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचं स्पष्ट होत आहे.

या प्रकरणाची गुंतागुंत लक्षात घेता पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. संबंधित लॉजच्या परिसरातील तसेच आसपासच्या रस्त्यांवरील आणि इतर व्यववसायिक आस्थापनांवरील सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज देखील मागवण्यात आले असून, त्या आधारे घटनाक्रमाची साखळी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. घटनेपूर्वी आणि नंतर कोण कोणत्या हालचाली करत होते, याचा तपशीलवार अभ्यास केला जात आहे.

दरम्यान, काही माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत विविध दावे-प्रतिदावे केले जात आहेत. काही ठिकाणी इतर पत्रकारांची नावे पुढे आणली जात असली, तरी पोलिसांनी अद्याप अशा कोणत्याही डाव्यांना अधिकृत दुजोरा दिलेला नाही. उलट, अप्रमाणित माहिती पसरवू नये, असे आवाहन पोलिसांपासून करण्यात आले आहे. सध्या तरी या प्रकरणात अनेक पैलू समोर येत असून, तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांकडून सर्व तांत्रिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि डिजिटल डेटा यांचा सखोल अभ्यास केला जात आहे. या प्रकरणात नेमकी जबाबदारी कोणाची, इतर कोणाचा सहभाग आहे का, आणि स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली नेमकं काय घडलं, याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत या प्रकरणाकडे संपूर्ण पुणे शहरासह राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version