पुण्यातील एअर होस्टेस वर्षा तुरकरची संशयास्पद हत्या, गोदियामधील जंगलात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
एअर होस्टेस म्हणून कार्यरत असलेल्या वर्ष तुर्कार हिच्या संशयास्पद हत्येने गोंदिया आणि मध्य प्रदेशातील बालाघाट परिसरात खळबळ उडाली आहे.
Suspicious murder of air hostess Varsha Turkar : पुण्यात इंडिगो एअरलाईन्समध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत असलेल्या वर्ष तुर्कार हिच्या संशयास्पद हत्येने गोंदिया आणि मध्य प्रदेशातील बालाघाट परिसरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील दवणीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोंडरानी येथील वैनगंगा नदीकाठच्या जंगल परिसरात तिच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वर्षाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणात लुटमारीचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी घटनाक्रमातील काही बाबींमुळे संशय निर्माण झाला आहे. पोलिसांनी गोंदियातील नितेश अग्रवाल याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त वर्षा आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील खैरी या माहेरी आली होती. 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ती जुना परिचित नितेश अग्रवाल याच्यासोबत वैनगंगा नदीकाठी फिरण्यासाठी गेली होती. काही वेळानंतर नितेशने वर्षाच्या कुटुंबीयांना फोन करून अज्ञात व्यक्तींनी लुटमारीच्या उद्देशाने हल्ला केल्याचे सांगितले. नातेवाईक घटनास्थळी पोहोचले असता वर्षा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिला तातडीने खैरलांजी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
बिग बींच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट! दोन संशयितांना अटक, अमिताभ बच्चन म्हणाले ‘बच गए’
या प्रकरणात नितेशला कोणतीही दुखापत झाली नसल्याची बाब पोलिसांच्या तपासात महत्त्वाची ठरत आहे. हल्लेखोरांनी केवळ वर्षालाच लक्ष्य का केले? लुटमारीचा प्रयत्न झाला असेल, तर नितेश सुरक्षित कसा राहिला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांकडून नितेशच्या जबाबाची पडताळणी केली जात असून वर्षाचा पती समर सैयद याच्याकडेही तपासाच्या अनुषंगाने लक्ष दिले जात असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप कोणाचाही या हत्येतील सहभाग सिद्ध झालेला नाही.
वर्षाने 2021 मध्ये समर सैयद याच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ती पतीसोबत पुण्यात वास्तव्यास होती. दोघेही विमानसेवा क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती आहे. त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे. या घटनेमुळे चिमुरडीच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले आहे. वर्षाच्या वडिलांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
भारतीय वैद्यकीय क्षेत्रात रचला इतिहास! AIIMS दिल्लीकडून आईच्या गर्भातच बाळाच्या मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया
दरम्यान, घटनास्थळ महाराष्ट्रातील दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी पोलिसांनी पंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर संबंधित कागदपत्रे 15 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली. दवनीवाडा पोलीस निरीक्षक प्रशांत भूते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
वर्षाची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली? लुटमारीचे कथन खरे आहे की त्यामागे दुसरेच कारण आहे? हल्लेखोर कोण होते आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. घटनास्थळावरील पुरावे, संशयितांचे जबाब आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या प्रकरणाचा उलगडा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे एअर होस्टेस वर्षा तुरकर हिच्या संशयास्पद हत्येचा तपास आता कोणत्या दिशेने जातो, याकडे गोंदिया, बालाघाट आणि पुण्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.