Download App

पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ; रोहित पवारांच्या मागणीची अजितदादा अन् मुंडेंकडून दखल!

मुंबई : सातत्याने येत असलेल्या तक्रारी लक्षात घेत केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्ज भरण्यास तीन दिवसांची मुदत वाढ दिली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतची माहिती दिली. याआधी 31 जुलै ही शेवटची तारीख होती, मात्र पावसामुळे गावांचा संपर्क तुटणे, नेटवर्क नसणे, सर्व्हर डाऊन होणे अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना विमा भरण्यास अडचण येत असल्याच्या तक्रारी येत काही दिवसांपासून येत होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मुदत वाढवून देण्याची मागणी केंद्राला करण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. (Central government has extended the deadline of three days to fill the application for Pradhan Mantri Crop Insurance Yojana)

काय म्हणाले धनंजय मुंडे?

या खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असून आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी 3 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे, अशी माहिती देत उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज 3 ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरून घ्यावा, असं आवाहनही धनंजय मुंडे यांनी केलं.

रोहित पवार यांच्या आग्रही मागणीला यश :

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी आग्रही मागणी लावून धरली होती. राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने माझ्या मतदारसंघासह राज्यातील अनेक गावांचा संपर्क तुटणे, नेटवर्क नसणे, सर्व्हर डाऊन अशा विविध कारणांनी शेतकऱ्यांना विमा भरण्यास अडचण येत आहे.त्यामुळं ऑनलाईन पीक विमा भरण्याची ३१ जुलैची अंतिम मुदत वाढवावी अशी मागणी करत रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती.

याशिवाय कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचीही रोहित पवार यांनी भेट घेतली होती. मागील तीन दिवसांपासूनही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पीक विमा भरण्यास मुदवाढ देण्याची मागणी लावून धरली होती. आता अखेर याबाबत राज्य सरकारच्या विनंतीनंतर या योजनेची मुदत वाढविण्यात आली आहे. आता 3 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना पंतप्रधान विमा योजनेसाठी अर्ज भरता येणार आहेत.

Tags

follow us