Chakan Industrial Issue Why These Area Important For Pune : पुण्याच्या औद्योगिक विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्येने आता गंभीर वळण घेतलं आहे. वाहतूक कोंडी, खराब रस्ते, पाणी साचणे, अपुऱ्या सुविधा आणि प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई यामुळे चाकणमधील 20 कंपन्यांनी आपला व्यवसाय दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कंपन्यांमध्ये सुमारे 2 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. उद्योजकांनी कंपन्या खंडाळा औद्योगिक वसाहतीत स्थलांतरित करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे हा केवळ चाकणचा प्रश्न राहिलेला नसून, पुण्याच्या औद्योगिक अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. नेमका चाकणचा पट्टा उद्योगाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे आणि येथील उद्योग दुसरीकडे स्थलांतरीत झाले तर त्याचा पुण्यावर काय परिणाम होऊ शकतो? याचा घेतलेला हा आढावा…
चाकण पुण्यासाठी इतकं महत्त्वाचं का?
पुणे शहराच्या उत्तरेला असलेला चाकण-तळेगाव औद्योगिक पट्टा हा पुणे जिल्ह्याच्या उत्पादन आणि ऑटोमोबाईल उद्योगाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. या परिसरात वाहननिर्मिती, ऑटोमोबाईल पार्ट्स, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल आणि इतर पूरक उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत. चाकण एमआयडीसीमध्ये सुमारे 750 लघु उद्योग असून त्यातून दरवर्षी तब्बल 32 हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा दावा उद्योजकांनी केला आहे. त्यामुळे या परिसरातील एखाद्या कंपनीचं स्थलांतर म्हणजे केवळ एका उद्योगाचं ठिकाण बदलणं नाही तर, त्याचा परिणाम संपूर्ण सप्लाय चेन, वाहतूकदार, कंत्राटदार, कामगार आणि स्थानिक व्यवसायांवर होऊ शकतो.
एक कंपनी जाते, पण रोजगाराच्या किती संधी धोक्यात येतात?
चाकणच्या कंपन्यांमध्ये केवळ थेट कर्मचारी काम करत नाहीत. एखाद्या कारखान्याभोवती शेकडो छोटे उद्योग, कच्चा माल पुरवठादार, ट्रान्सपोर्ट कंपन्या, पॅकेजिंग, दुरुस्ती सेवा, हॉटेल्स, किरकोळ दुकाने आणि इतर व्यवसाय उभे राहतात. त्यामुळे एखादी कंपनी चाकणमधून बाहेर गेल्यास थेट कर्मचाऱ्यांबरोबरच अप्रत्यक्ष रोजगारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. चाकणमधील समस्यांचा परिणाम आधीच मोठ्या संख्येने उद्योग आणि कामगारांवर होत आहे. त्यामुळे आणखी कंपन्यांनी स्थलांतराचा निर्णय घेतल्यास त्याचा फटका पुण्याच्या रोजगार बाजारालाही बसू शकतो असे उद्योजकांचे म्हणणे आहे.
वाहतूक कोंडीमुळे उद्योगाचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया
चाकणमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी आहे. भोसरी ते चाकण-आंबेठाण चौक या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत मोठी वाहतूक कोंडी होते. काही वेळा हे अंतर पार करण्यासाठी तीन तासांहून अधिक वेळ लागतो. याचा थेट परिणाम कंपन्यांच्या उत्पादनावर होतो. कर्मचारी वेळेवर पोहोचत नाहीत, मालवाहतूक रखडते, कच्चा माल कारखान्यात पोहोचण्यास विलंब होतो आणि तयार माल बाजारात पाठवण्याच्या प्रक्रियेलाही फटका बसत असल्याचे येथील उद्योजकांचे म्हणणे आहे. खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीचा खर्च शेवटी उद्योगाच्या उत्पादनक्षमतेवर आणि नफ्यावर पडत असल्याचे चित्र आहे.
फक्त 20 नव्हे तर, आणखी उद्योग बाहेर पडण्याची भीती
सध्या 20 कंपन्यांनी स्थलांतराचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली असली, तरी उद्योजकांनी सुमारे 200 कंपन्या अशाच समस्यांचा सामना करत असल्याचा दावा केला आहे. यामुळे भविष्यात आणखी कंपन्यांनी चाकणमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर पुण्याच्या औद्योगिक पट्ट्यासमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं. विशेष म्हणजे, कंपन्यांना चाकण सोडायचं नसून पायाभूत सुविधांच्या अभावामुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं उद्योजकांचं म्हणणं आहे.
चाकणमधून कंपन्या बाहेर पडल्या तर, पुण्याला नेमका काय फटका?
चाकणमधून मोठ्या प्रमाणावर उद्योग स्थलांतरित झाल्यास याचे पुणे आणि आजूबाजूच्या घटकांवर काही महत्त्वाचे परिणाम होऊ शकतात. यात स्थानिक आणि औद्योगिक रोजगारावर परिणाम होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग सप्लाय चेनवर दबाव येईल. लघु आणि मध्यम उद्योगांच्या व्यवसायावर परिणाम होईल. ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक्स आणि सेवा क्षेत्राला फटका बसण्याबरोबरच पुणे जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीच्या प्रतिमेला धक्का बसेल. नव्या कंपन्यांनी पुण्याऐवजी इतर औद्योगिक क्षेत्रांची निवड करण्याचा धोका निर्माण होण्याबरोबरच स्थानिक पातळीवरील व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी कमी होण्याची शक्यता निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय, पुण्यात उद्योग आणायचे की, पुण्यातील उद्योग टिकवायचे? हा प्रश्नही यामुळे निर्माण होईल.
प्रशासनाचीही आता कसोटी
चाकणमधील वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने बुधवारी (दि.12) दुपारी आढावा बैठक आयोजित केली आहे. एमआयडीसीच्या माहितीनुसार, चाकण आणि तळेगाव येथे मोठ्या क्षेत्रावर औद्योगिक वसाहती विकसित करण्यात आल्या आहेत. पावसामुळे पाणी साचणे, खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आणखी वाढल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र, उद्योजकांचा आरोप आहे की एमआयडीसी, पीएमआरडीए, एनएचएआय आणि इतर सरकारी यंत्रणा रस्त्यांच्या जबाबदारीबाबत एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे बैठका आणि आश्वासनांपलीकडे प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
चाकण वाचवणं म्हणजे पुण्याचा औद्योगिक कणा वाचवणं?
चाकणमधून काही कंपन्या बाहेर पडण्याची घटना वरकरणी स्थानिक पातळीवरील समस्या वाटत असली, तरी तिचे पडसाद पुण्याच्या उद्योग, रोजगार आणि अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे आता प्रश्न केवळ रस्ते आणि वाहतूक कोंडीचा नाही. पुण्याचा महत्त्वाचा औद्योगिक पट्टा उद्योगांसाठी सक्षम ठेवण्यासाठी सरकार प्रत्यक्षात किती वेगाने पावलं उचलतं, यावर चाकणमधील उद्योगांचं भवितव्य अवलंबून आहे.
