उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय; चंद्रकांत पाटील यांच्याकडून 5,500 प्राध्यापक पदांसाठी भरतीची घोषणा

राज्यात 5,500 प्राध्यापक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

Untitled Design 24

Untitled Design 24

Chandrakant Patil announces recruitment : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आली आहे. राज्यात तब्बल 5,500 प्राध्यापक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. नवी मुंबई येथे महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या पिल्लई विद्यापीठाच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या प्राध्यापक पदांबाबत सरकारने ठोस निर्णय घेतल्याची माहिती दिली.

सध्या राज्यातील महाविद्यालयांमध्ये सुमारे 11 हजार प्राध्यापक पदे रिक्त आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 5,500 पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आचारसंहिता संपताच ही भरती प्रक्रिया वेगाने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ महाविद्यालयांपुरतेच नव्हे, तर विद्यापीठ कॅम्पसमधील सुमारे 700 प्राध्यापक पदे भरण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या शैक्षणिक आणि संशोधनात्मक कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पोलीस ठाण्यातच तरुणीचा सौदा; महिला हवालदाराच्या निलंबनानंतर पोलिसांचं बुधवार पेठेत कोम्बिंग ऑपरेशन

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली प्राध्यापक भरती आता प्रत्यक्षात सुरू होणार असल्याने उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार अध्यापन आणि संशोधनाची संधी उपलब्ध होण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, राज्यात मोठ्या प्रमाणावर नोकरभरतीचीही घोषणा करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये मिळून सुमारे 70 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

त्यापैकी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुमारे 20 हजार पदे भरली जाणार आहेत. उर्वरित पदांसाठी संबंधित विभागांकडून भरती केली जाईल. या भरतीमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भातील नियमावलीत आवश्यक सुधारणा करण्याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील युवकांसाठी आणि उच्च शिक्षण क्षेत्रासाठी ही भरती प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

Exit mobile version