कोल्हापूर : कोल्हापुरात राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला आणि हाच वारसा अद्याप ही छत्रपती घराणे पुढे घेऊन जात आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ऐतिहासिक शाहू खासबाग मैदानात निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या निकाली कुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.
राज्यात जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी वाड्यावर न राहता ते जनतसोबत राहिले. अनेक संस्था उत्तमरित्या चालवत आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गौरवोद्गार काढले.
शरद पवार म्हणाले की, हा सोहळा आनंद देणारा आहे. अनेक राजवाडे होऊन गेले, पण त्यांची राज्ये त्यांच्या नावाने केली होती, पण एकच राज्य असं होतं जे कुटुंबाच्या नावाने नव्हते. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं राज्य रयतेचं राज्य होतं. ते हिंदवी स्वराज्य होतं. हा इतिहास छत्रपतींच्या घराण्यांनी जतन केला आहे.
समतेची विचारधारा कृतीमध्ये आणण्यासाठी राजा कोणता याची चर्चा देशात होते तेव्हा पहिल्यांदा नाव छत्रपती शाहू महाराजांचे येते. ही शाहू महाराजांची विचारधारा, परंपरा सातत्याने छत्रपतींनी जपली याचा आनंद आहे.
छत्रपती असूनही त्यांचे लक्ष शेवटच्या माणसासाठी आहे. महाराष्ट्रात अनेक संकटे आली, महापूर आला, कोरोनाचे संकट आले तेव्हा छत्रपती वाड्यात राहिले नाहीत, ते सामान्य माणसांचे दु:ख कमी करण्यासाठी रस्त्यावर आले.
शरद पवार यांच्या हस्ते करवीर अधीपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा चांदीची गदा, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सतेज पाटील उपस्थित होते.