महाराष्ट्रात पावसामुळे हाहाकार उडाला आहे, राज्याला पावसानं झोडपून काढलं आहे. यामध्ये मराठवाडा सर्वाधिक वाईट अवस्थेत सापडला आहे. शेतकऱ्यांची पीक, फळबागा तर गेल्याच पण घरा-दारासह शेतही वाहून गेली आहेत. ऐन हाततोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतल्यानं शेतकरी हातबल झाले आहेत. (Rain) या सगळ्या परिस्थितीत शेतकरी बांधवांना मदतीची मोठी गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजणी आणि निलंगा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानाची पहाणी केली, यावेळी बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे. सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत, कुठंही अधिकचे निकष न लावता आणि आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून सरकारला नागरिक केंद्रीत मदत करायची आहे.
राज्यभरात पावसाचा जोर कायम; अनेक जिल्ह्यात ढगफुटी, वाचा एका क्लिकवर कुठं काय स्थिती?
आम्ही पैसे रीलीज करायला सुरुवात केली आहे. नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 2 हजार 200 कोटींचा पहिला हाप्ता मंजूर झाला आहे. दिवाळीपूर्वीच सर्व शेतकऱ्यांना मदत मिळेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे, यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान यंदा राज्यातील मराठवाड्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे.
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे, पावसामुळे उभी पिकं पाण्याखाली गेली असून, शेतीचंही प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक नद्यांना पूर आल्यानं पुराचं पाणी गावात शिरल्याचं चित्र आहे, काही ठिकाणी गावाला पुराचा वेढा पडल्यानं नागरिक गावात अडकले आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे.